मुंबई| गुरुवारी (२१ एप्रिल) एमएस धोनी याने त्याला सर्वोत्तम फिनिशरपैकी एक का म्हणतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. गुरुवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने अखेरच्या चेंडूवर जिंकला आणि हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात एमएस धोनीने चेन्नईकडून विजयी चौकार मारला.
झाले असे की, मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज होती. पण, अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जयदेव उनाडकटने ड्वेन प्रीटोरियसला २२ धावांवर बाद केले. पण, नंतर अखेरच्या ४ चेंडूत धोनीने १६ धावा चोपत चेन्नईला विजय मिळवून दिला. यात त्याने एक षटकार, दोन चौकार आणि दुहेरी धावा अशा मिळून १६ धावा काढल्या.
अखेरच्या षटकात धोनीचीच हवा
धोनीने केलेल्या या धावांमुळे तो अखेरच्या षटकात प्रतिस्पर्ध्यांसाठी का धोकादायक आहे, हे दिसून येते. धोनीचा अखेरच्या षटकातील आकडेवारी पाहिली, तर अनेकांना आश्चर्यचकीत करणारी आहे. टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना धोनीने २० व्या षटकात १२१ चेंडू आत्तापर्यंत खेळले असून ३२३ धावा केल्या आहेत. तसेच २६ चौकार आणि २६ षटकार ठोकले आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईकरेट २६६. ९४ असा आहे.
तसेच आयपीएलमधील त्याची आकडेवारी पाहायची झाल्यास धोनीने २० व्या षटकांत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने २४४ च्या स्ट्राईकरेटने ५१ षटकारांसह ६३७ धावा केल्या आहेत (MS Dhoni in 20th overs in IPL).
उनाडकटसाठी धोनी ठरला व्हिलन
विशेष गोष्ट अशी की, धोनीने गुरुवारी जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकात १६ धावा काढल्या. त्यामुळे त्याने त्याच्याविरुद्ध आयपीएलमध्ये १०० धावाही पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये धोनीने उनाटकटच्या ४३ चेंडूंचा सामना करताना १०५ धावा केल्या आहेत. त्याने ४२ व्या चेंडूवर १०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे धोनी एकाच गोलंदाजाविरुद्ध जलद १०० आयपीएल धावा करणारा फलंदाजही ठरला.
एकाच गोलंदाजाविरुद्ध जलद १०० आयपीएल धावा करणारे फलंदाज
४२ चेंडू – एमएस धोनी विरुद्ध जयदेव उनाडकट
४७ चेंडू – सुरेश रैना विरुद्ध संदीप शर्मा
४७ चेंडू – एबी डिविलियर्स विरुद्ध संदीप शर्मा
४७ चेंडू – कायरन पोलार्ड विरुद्ध रवींद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या –
MIvsCSK: सामना विजयानंतर जडेजाने केले मॅच फिनिशर धोनीचे कौतुक, आपल्या चुकीबद्दलही दिली प्रतिक्रिया
मुंबई इंडियन्सच्या चुकांवर सचिनच्या शब्दांचे पांघरुण; म्हणतोय, ‘युवा संघ आहे, चुकांमधून…’
रोहित-विराटची विकेट घेणारा कोण आहे मुकेश चौधरी? महाराष्ट्र संघासाठीही केलीय दमदार कामगिरी