दुबई। रविवारी (१० ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या प्लेऑफ फेरीला सुरुवात झाली. रविवारी पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी १५ ऑक्टोबरला अंतिम सामन्यात नेतृत्व करताना दिसेल. त्यामुळे धोनीच्या नावावर मोठे विक्रम झाले आहेत.
धोनीने तब्बल दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने चेन्नई संघासह ९ वेळा, तर रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून १ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे तो पहिला असा खेळाडू ठरला आहे, ज्याने १० आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
याशिवाय शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) धोनी चेन्नईचे तब्बल अकराव्यांदा अंतिम सामन्यात नेतृत्व करताना दिसेल. धोनीने चेन्नईचे चॅम्पियन्स लीगमध्येही २ वेळा अंतिम सामन्यात नेतृत्व केले आहे.
तसेच कर्णधार म्हणून धोनी तब्बल नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. सर्वाधिक आयपीएलचे अंतिम सामने खेळणाऱ्या कर्णधारांच्या यादीत धोनी अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ रोहित असून त्याने ५ वेळा कर्णधार म्हणून आयपीएलचे अंतिम सामने खेळले आहेत विशेष म्हणजे हे पाचही सामने त्याने जिंकले आहेत. रोहित पाठोपाठ गंभीर असून त्याने २ वेळा अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून प्रवेश केला आहे.
एवढेच नाही, तर शुक्रवारी धोनी जेव्हा आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नईचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरु शकतो. शुक्रवारी धोनी ४० वर्षे १०० दिवस वय असताना चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल.
सध्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम चेन्नईच्याच इम्रान ताहिरच्या नावावर आहे. तो २०१९ साली चेन्नईकडून ४० वर्षे ४६ दिवस वय असताना अंतिम सामना खेळला होता. विशेष म्हणजे यंदा देखील ताहीरचा चेन्नई संघात समावेश आहे. त्यामुळे जर ताहीर यंदा अंतिम सामना खेळला, तर हा विक्रम त्याच्याच नावावर कायम राहिल.
महत्त्वाच्या बातम्या –
ती बघ उडाली! रिषभने जोरदार फटका खेळताच बॅट निसटून गेली हवेत; गिरक्या घेत आदळली जमिनीवर
‘माही’ बडे दिल वाला! रडणाऱ्या चिमुकीलाला धोनीकडून मिळाले सर्वात भारी गिफ्ट; तुम्ही पाहिलं का?