१० नोव्हेंबर २००८
भारतीय क्रिकेट संघाला विजयाची सवय लावणारा, प्रतिस्पर्ध्यांच्या नजरेला नजर भिडवून खेळायला शिकवणारा पण प्रिन्स ऑफ कोलकाता भारताचा एक यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीच्या निवृत्तीचा दिवस.
नुकतेच दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आपला प्रस्तावित दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करणार होता. पण, सुरक्षेची हमी भेटल्यावर ते येण्यास तयार झाले.
वर्षभरापूर्वी अखेरचा वनडे खेळल्यानंतर गांगुली अनेकदा खराब फॉर्म किंवा दुखापतीच्या कारणाने बाहेर होत होता. नवीन निवड समितीने त्याच्यावर विश्वास ठेवत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेसाठी त्याची निवड केली. निवड झाल्यानंतर, गांगुलीला समजुन चुकले की आता आपल्या कारकीर्दीची संध्याकाळ झालेली आहे.
मालिकेपूर्वी, संघाचे प्रशिक्षण शिबिर बेंगलोरमध्येच होते. प्रशिक्षण शिबिरानंतर गांगुलीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
बंगलोर येथील, पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताने दुसऱ्या मोहाली कसोटीत मोठा विजय मिळवत आघाडी घेतली. तिसरी कसोटी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरील तिसरी कसोटीदेखील निकाल न लागता संपली. अनिल कुंबळेच्या कारकिर्दीतील तो अखेरचा सामना ठरला. संघ सहकाऱ्यांनी, कर्णधार धोनीने कुंबळेला खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली. एका शानदार कारकीर्दीची अखेर झाली.
६ नोव्हेंबर रोजी चौथा कसोटी सामना नागपूरच्या जामठा मैदानावर होता. भारतीय क्रिकेटचा दादा निवृत्त होणार होता म्हणून वातावरणनिर्मिती झाली होती. हजारो प्रेक्षकांनी सामन्याच्या पाचही दिवसांची तिकिटे खरेदी केली होती.
कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पदार्पण करणारा मुरली विजय व अनुभवी वीरेंद्र सेहवाग यांनी आक्रमक सुरुवात करत ९० धावांची भागीदारी केली. सेहवाग,विजय आणि द्रविड पाठोपाठ बाद झाल्याने धावगतीला ब्रेक लागला. सचिन आणि लक्ष्मणने १३० धावांची भागीदारी करून डाव पूर्वपदावर आणला. लक्ष्मण बाद होताच, सौरव गांगुलीचे मैदानावर आगमन झाले. सुरेख ड्राईव्ह मारत त्याने सुरुवात केली. दरम्यान, सचिनने आपले शतक पूर्ण केले आणि तो बाद झाला.
आता, भारताचे आजी-माजी कर्णधार ही जोडी जमली. दादाने, आपल्या अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात ८५ धावा करत प्रेक्षकांचे पैसे वसूल केले. भारताने ४४१ धावसंख्या रचली. पुढे, गोलंदाजांच्या एकत्रित खेळाने भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव ३५५ धावांवर सिमीत ठेवला. ८६ धावांची आघाडी भारताला मिळाली होती.
दुसऱ्या डावात सेहवागने नेहमीप्रमाणे गोलंदाजांचे सालटे काढत ९२ धावा चोपल्या. भारताची धावसंख्या १६३-३ असताना, जेसन क्रेझाने लक्ष्मणला बोल्ड केलं. एरवी, भारतीय खेळाडू बाद झाल्यावर शांत होणारे स्टेडियम लक्ष्मण बाद होताच आनंदाने नाचू लागले. कारण, सर्वांचा लाडका दादा शेवटच्या वेळी भारतासाठी बॅटिंगला उतरणार होता.
जामठा मैदानावर गांगुलीने पाय ठेवताच प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले. “दादा दादा” चा नाम घोष सुरु झाला. इतकी वर्ष आपल्या नेत्रदीपक खेळाने, लाजवाब कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कटने मंत्रमुग्ध केलेल्या या ‘ऑफ साईड’ च्या बादशाहाचे पुन्हा तेच फटके मारताना आज शेवटचे पाहणार होते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही दादाचे स्वागत केले.
आपली तीच एव्हरग्रीन स्माईल देत दादाने गार्ड घेतले. समोर आपली पहिली मॅच खेळणारा क्रेझा होता. मैदानावर अजून दादाचे नाव घुमत होते. क्रेझाने चेंडू टाकला आणि दादाने चेंडू पुश करत त्याच्या हाती झेल दिला.
मैदानावर स्मशानशांतता पसरली. दादा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. डॉन ब्रॅडमन हेसुद्धा आपल्या शेवटच्या कसोटीत खाते उघडता बाद झाले होते. असाच काहीसा हा प्रकार झाला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील जल्लोष केला नाही. सर्वांचे चेहरे हिरमुसले होते. प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारत दादा पव्हेलियनकडे रवाना झाला. प्रेक्षकांचा पुरता भ्रमनिरास झाला होता.
पुढे, धोनी आणि हरभजनने वयक्तिक अर्धशतके झळकवत भारताचा धावफलक २९५ धावापर्यंत नेला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरुवातीपासूनच अडखळू लागला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १९७-९ असताना पाचव्या दिवशी लंचसाठी खेळ थांबला होता. ऑस्ट्रेलियाची फक्त एक विकेट शिल्लक होती. गांगुलीला भारतीय कपड्यात पाहण्याची ती शेवटची संधी होती.
लंचनंतर, खेळ सुरू होण्याअगोदर, मैदानात प्रवेश करता भारतीय संघाने त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. हर्डलमध्ये, शेवटचे संदेश दिले गेले आणि खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी जात असतानाच धोनी गांगुलीसोबत काहीतरी बोलू लागला व धोनीने सर्व खेळाडूंना थांबवले.
धोनीने निर्णय घेतला होता की, या उरलेल्या वेळासाठी दादा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. सर्व खेळाडूंना धोनीचे योजना खूप आवडली. दोन वर्षांपूर्वी ज्या दादाला भारतीय संघासाठी शेवटचे कप्तानी करताना पाहिले होते तू दादा पुन्हा कप्तानी करत होता. तेच हावभाव, तेच हातवारे पाहून प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
मैदानात एकसारखा “दादा दादा” आवाज येत होता. तिसऱ्या षटकात हरभजनने जॉन्सनला पायचीत करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. भारताने आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराला विजयाची भेट दिली होती.
सर्व खेळाडू गांगुलीला मिठी मारत होते. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. पूर्ण मैदान आणि दूरदर्शनवर सामना पाहणारे कोट्यावधी क्रिकेटप्रेमी भावनिक झाले होते. खेळाडूंनी भारतीय क्रिकेटच्या या युवराजाला आपल्या खांद्यावर घेऊन पव्हेलियनपर्यंत नेले. गॅलरीमधून प्रेक्षकांच्या शुभेच्छा स्वीकार करताना त्याने आपल्या खास शैलीत शर्ट प्रेक्षकांत भिरकावला.
भारतीय क्रिकेटचा एक अध्याय पूर्ण झाला होता. भारतीय क्रिकेटमध्ये जिगर निर्माण करणारा दादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.