इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१० एप्रिल) सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला छाप पाडता आली नाही. तो शुन्य धावेवर बाद झाला.
सहा वर्षांनंतर धोनी शुन्यावर बाद
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्याला भोपळा पण फोडता आला नाही. तो केवळ दुसराच चेंडू खेळताना आवेश खानाविरुद्ध त्रिफळाचीत झाला.
विशेष म्हणजे धोनीने शुन्यावर बाद होण्याची घटना आयपीएलमध्ये तब्बल ६ वर्षांनी आणि १०८ डाव त्याने खेळल्यानंतर घडली आहे. यापूर्वी धोनी आयपीएलमध्ये शेवटचे २०१५ सालच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध शुन्यावर बाद झाला होता. तसेच धोनीची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. तो २०१५ पूर्वी २०१० सालच्या हंगामात दोनवेळा शुन्यावर बाद झाला होता.
धोनीला २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या शेन वॉर्नने आणि दिल्ली डेअरडेविल्स (दिल्ली कॅपिटल्स) कडून खेळणाऱ्या डर्क नॅन्स यांनी शुन्यावर बाद केले होते. त्यानंतर २०१५ साली हरभजन सिंगने धोनीला शून्यावर बाद करण्याची किमया केली होती. त्यानंतर आता आवेश खानने हा पराक्रम केला आहे.
धोनी जरी शुन्यावर बाद झाला तरी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांच्याकडून सुरेश रैना याने ताबडतोड ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासोबतच मोईन अली याने ३६ तर रायुडूने २३ आणि जडेजाने २६ धावांची खेळी केली. यासोबतच करनने शेवटी येऊन ३४ धावांची आक्रमक खेळी केली.
दिल्लीचा विजय
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शॉ आणि शिखर धवन यांनी १३८ धावांची सलामी भागीदारी रचली. शिखर धवन याने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉ याने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यांच्या या भागीदारीनंतर रिषभ पंतने नाबाद १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश
कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत
‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल