---Advertisement---

हे आहेत एमएस धोनीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण…

On: शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2019 11:51 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. पण या 15 वर्षांच्या कारकिर्दीतील दोन अविस्मरणीय क्षणांबद्दल धोनीने खुलासा केला आहे.

धोनीने त्याच्या कारकिर्दीतील 2007 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवल्यानंतर भारतात झालेले संघाचे स्वागत आणि 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात वानखेडे स्टडियममध्ये प्रेक्षकांनी गायलेले ‘वंदे मातरम’, हे सर्वात खास क्षण असल्याचे म्हटले आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी20 विश्वचषक, 2011 ला वनडे विश्वचषक, 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी असे महत्त्वाची विजेतीपदे मिळवली आहेत. तसेच कसोटीतही भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली अव्वल क्रमांकावर आला होता.

“येथे मी दोन घटनांचा उल्लेख करू इच्छित आहे. 2007 टी20 विश्वचषकानंतर आम्ही भारतात परत आलो आणि ओपन बसमध्ये चाललो होतो. त्यावेळी आम्ही मरीन ड्राईव्हवर (मुंबईत) उभे असताना सर्वत्र लोक होते, लोक त्यांच्या कारमधून बाहेर पडले होते,” असे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार धोनी म्हणाला.

“प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मला बरे वाटले. कारण, गर्दीत अशी पुष्कळ लोक असू शकतात ज्यांना त्यांची विमानप्रवासाची वेळ चुकली असतील, कदाचित ते एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असतील. त्यावेळी आमचे जसे स्वागत झाले ते शानदार होते. संपूर्ण मरीन ड्राइव्ह एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरला होता,” असे 38 वर्षीय धोनी पुढे म्हणाला.

तसेच धोनीने त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या महत्त्वाच्या क्षणाबद्दल सांगताना 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचा उल्लेख केला.

धोनी म्हणाला, ”दुसरा क्षण मी म्हणेन की 2011 विश्वचषकाचा अंतिम सामना. त्या सामन्यात जेव्हा विजयासाठी शेवटच्या 15-20 धावांची आवश्यक होती, तेव्हा सर्व प्रेक्षकांनी वानखेडे स्टेडियमवर ज्या प्रकारे ‘वंदे मातरम’ चा जयघोष केला होता, ते खास होते.”

”हे दोन क्षण आहेत, मला वाटते, त्यांची पुनरावृत्ती होणे खूप कठीण आहे. ते दोन क्षण आहेत जे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---