चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या हंगामानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, अशी सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. कारण आयपीएलच्या १३व्या हंगामादरम्यान तो बऱ्याचदा खेळाडूंना आपली चेन्नई संघाची जर्सी भेट देताना दिसला. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध हंगामातील शेवटचा सामना खेळल्यानंतर त्याने या चर्चांवर पूर्णविराम लावला. तसेच, विरोधी संघांच्या मनातील एका गोष्टीवर हात घातला.
विरुद्ध संघातील खेळाडूंना पडलाय प्रश्न
झाले असे की, चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रविवारी (१ नोव्हेंबर) आयपीएल २०२० चा ५३ वा सामना झाला. ९ विकेट्सने हा सामना खिशात घालत चेन्नईने हंगामाचा गोड शेवट केला. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी डॅनी मॉरिसन यांनी धोनीला त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला.
पंजाब विरुद्धचा हा सामना आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे का?, असा त्यांचा प्रश्न होता. त्यावर धोनीने सांगितले की “नक्कीच नाही. हा सामना माझा चेन्नई संघासाठीचा शेवटचा सामना नाही.”
तरीही सामना झाल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी पुन्हा धोनीच्या आयपीएल निवृत्तीचा विषय काढला. “तुझ्याकडे अजूनही बऱ्याच जर्सी उपलब्ध आहेत, हे पाहून चांगले वाटले. प्रत्येकाला तुला जर्सी हवी असल्याचे दिसत आहे,” असे अप्रत्यक्षपणे भोगले धोनीला निवृत्तीविषयी बोलत होते.
यावर धोनी म्हणाला की, “कदाचित खेळाडूंना वाटत आहे की मी खरोखर आयपीएलमधून निवृत्त होतोय. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकल्यामुळे त्यांना असे वाटत असावे. पण असे अजिबात नाही. मी अजिबात आयपीएलमधून निवृत्त होण्याच्या विचारात नाही.”
"Definitely not" 😊😊#Dream11IPL pic.twitter.com/n9aggYDeFM
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली होती निवृत्ती
आयपीएल २०२० सुरू होण्याआधी धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत तो निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले होते.
धोनीची आयपीएल कारकीर्द
धोनीने आयपीएलमध्ये २०४ सामने खेळले असून यात त्याने ४०.९९ च्या सरासरीने ४६३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने ११२ झेल आणि ३९ यष्टीचीत केले आहेत. तो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारताच्या ‘या’ राज्यात बनेल एमएस धोनीचे मंदीर,” माजी क्रिकेटरचे मोठे विधान
“शेवटच्या वेदनादायक १२ तासांचा आनंद घ्या”, असे का म्हणाला एमएस धोनी, घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ