चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६८वा साखळी फेरी सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.४ षटकातच ५ विकेट्सच्या नुकसानावर चेन्नईचे आव्हान गाठले आणि ५ विकेट्सने सामनाही जिंकला.
प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला चेन्नई संघ (Chennai Super Kings) कमीत कमी शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत हंगामाची अखेर करेल अशी अपेक्षा होती. परंतु चेन्नईला विजयी शेवट करण्यात अपयश आले. सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने संघाच्या पराभवामागचे कारण सांगितले आहे.
“मला वाटते की, आम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, आम्ही खूप हलकी फलंदाजी करत होतो. त्यामुळे जेव्हा आम्ही विकेट गमावल्या, तेव्हा मोईन अलीला त्याच्या विस्फोटक प्रदर्शनावर थोडा अंकुश लावावा लागला. विकेट गमावल्यानंतर आम्ही जबाबदारीत थोडी अदला बदल केली. जर आम्ही त्यावेळी आम्ही आणखी एक विकेट गमावली असती तर आमच्याकडे सामना वाचवण्यासाठी काहीही उरले नसते. मी मान्य करतो की, आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. पण नेहमी सामन्यात सुरुवात महत्त्वाची असते. जर तुम्ही सुरुवातच योग्य करत नसाल, तर तुमच्यासाठी १८० धावाही पुरेशा होत नाही,” असे धोनीने (MS Dhoni Statement) म्हटले.
पावरप्लेमध्ये चेन्नईला विकेट्स काढून देणारा मुकेश चौधरी राजस्थानविरुद्ध सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत एकही विकेट घेतली नाही. चौधरीच्या गोलंदाजीबद्दल धोनी म्हणाला की, “त्याला पटापट खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. प्रत्येक सामन्यानंतर त्याला त्याच्या चुका सुधारायच्या आहेत, जे की युवा खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचे आहे. पुढील हंगामात असे नाही व्हायला पाहिजे की, तो नव्याने त्याच्या गोलंदाजीची सुरुवात करेल.”
याबरोबरच धोनीने मथीशा पथीराणाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. बेबी मलिंगा म्हणून ओळखला जाणाऱ्या पथीराणाला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. याबाबत धोनी म्हणाला की, “आमच्या मलिंगाला निवडणे कठीण आहे आणि तो निश्चितच पुढील वर्षी आमच्यासाठी योगदान देईल. फलंदाज असो वा गोलंदाज असो, तुम्हाला संधीचा अधिकाधिक फायदा घेता आला पाहिजे. ही काय फक्त एका वर्षाची स्पर्धा नाही. तुम्ही दरवर्षी येथे येता. पुढची १०-२० वर्षे खेळाडू म्हणून पुढे जाणे ही मुख्य गोष्ट आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा