इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सध्या प्लेऑफचे सामने सुरू आहेत. यातील पहिला क्वालिफायर सामना रविवार रोजी (१० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात चेन्नईने ४ विकेट्सने बाजी मारली. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने अंतिम २ षटकात दणकेबाज फलंदाजी करत १९.४ षटकातच संघाला विजय मिळवून दिला.
दिल्ली संघातील तगड्या गोलंदाजी आक्रमणापुढे धोनीने निर्भीड फटकेबाजी केली आणि सामना आपल्या बाजूने वळवला. सामन्यानंतर त्याने दिल्लीच्या गोलंदाजांविरुद्ध अंतिम षटकात काय योजना आखल्या होत्या?, याविषयी उलगडा केला आहे.
दिल्लीच्या संघाकडे एन्रिच नॉर्किए, कागिसो रबाडा, आवेश खान, अक्षर पटेल, आर अश्विन आणि टॉम करन यांच्यासारखे एकाहून एक सरस गोलंदाज होते. त्यामुळे त्यांचे गोलंदाजी आक्रमण पाहता पहिला क्वालिफायर सामना जिंकणे सोपे नसणार, याची जाणीव आधापासूनच आपल्याला असल्याचे त्याने सांगितले आहे.
तो म्हणाला की, ‘माझी खेळी महत्त्वपूर्ण होती. दिल्ली संघाचे गोलंदाजी आक्रमण खूप बळकट होते. त्यांनी परिस्थितींचा पुरेपूर फायदा घेतला. त्यामुळे आम्हाला माहिती होते की हा सामना आमच्यासाठी सोपा नसेल. मी या हंगामात जास्त विशेष फलंदाजी करू शकलो नाही. मला चेंडूला पारखून फलंदाजी करायची होती. मी नेट्समध्ये खूप चांगली फलंदाजी करत होतो. परंतु मैदानावर माझी फलंदाजी तितकी प्रभावी नव्हती. मात्र मी माझ्या फलंदाजीविषयी जास्त विचार केला नाही. कारण यामुळे रणनितीवर परिणाम होतो.’
या सामन्यात १८.१ षटकात ऋतुराज गायकवाडची विकेट गेल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी आला होता. याच षटकात त्याने एका षटकारासह मोईन अलीसोबत मिळून ११ धावा जमवल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या २० व्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती.
या निर्णायक षटकातील पहिल्याच चेंडूवर अष्टपैलू मोईन अली टॉम करनच्या जाळ्यात अडकला. पण षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट घेणाऱ्या टॉमला धोनीने सलग २ (दुसऱ्या व तिसऱ्या) चेंडूवर खणखणीत चौकार ठोकले. पुढील चेंडू वाईड गेल्यानंतर पुन्हा त्याच चेंडूवर त्याने चौकार खेचला आणि १९.४ षटकातच संघाचा विजय निश्चित केला. अशाप्रकारे एका वाईड चेंडूच्या धावेला पकडून त्याने या षटकात त्याने १३ धावा काढल्या आणि पुन्हा एकदा चेन्नई संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्स ऑफिसमध्ये सलमान आणि मोठ्या सामन्यात…’, जुना संघसहकारी केदारकडून धोनीचे खास शब्दांत कौतुक