चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवार रोजी (१० ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा पहिला क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने १९.४ षटकात दिल्लीचे १७३ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि ४ विकेट्सने सामना खिशात घातला.
दरम्यान चेन्नईचा फलंदाज अंबाती रायुडू त्यांच्या या विजयात आपले योगदान देऊ शकला नाही. तो या सामन्यात एकेरी धावसंख्येवर धावबाद झाला. यासह नकोशा विक्रमाच्या यादीत त्याचा नावाचा समावेश झाला आहे.
संघाची धावसंख्या ३ बाद ११७ धावा असताना रायुडू पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी मध्यक्रमात त्याच्याकडून मोठ्या आकडी धावसंख्येची अपेक्षा होती. परंतु अवघ्या ३ चेंडूंचा सामना करताना १ धाव काढत तो पव्हेलियनला परतला. त्यातही कागिसो रबाडा आणि श्रेयस अय्यरने मिळून त्याला दुर्देवीपणे धावबाद केले. यासह तो आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
आयपीएलमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळताना धावबाद होण्याची ही रायुडूची १४ वी वेळ होती. यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या एबी डिविलियर्सची बरोबरी केली आहे. डिविलियर्सही आयपीएलमध्ये आतापर्यंत १४ वेळा धावबाद झाला आहे.
तर रायुडूचा संघ सहकारी आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना याबाबतीत रायुडूच्याही पुढे आहे. तो १५ वेळा धावबाद झाला आहे. तर शिखर धवन आणि गौतम गंभीर सर्वाधिक १६ वेळा धावबाद झाले आहेत.
भलेही रायुडू या महत्त्वपूर्ण सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही, परंतु त्याने आयपीएल २०२१ च्या पूर्ण हंगामात चेन्नई संघासाठी बऱ्याच धावा काढल्या आहेत. त्याने या हंगामात १५ सामने खेळताना २५७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जशास तसे! ऋतुराजला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी अश्विनने लढवली युक्ती, फलंदाजाने त्यालाच घडवली अद्दल
हे फक्त धोनीच करू शकतो! ‘कॅप्टनकूल’ने वाचल्या ऋतुराजच्या डोक्यातील गोष्टी, स्वत:च केला उलगडा






