भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला यावर्षीचा पदमभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानुसार त्याला काल राष्ट्रपती भवनात पदमभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर आज धोनीने सैन्यदलाचे आभार मानले आहेत.
पदमभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी काल त्याच्या लेफ्टनंट कर्नलच्या गणवेशामध्ये उपस्थित होता. तसेच त्याने हा पुरस्कारही परेड करत स्वीकारला. धोनीला २०११ च्या विश्वचषक विजयानंतर लेफ्टनंट कर्नल ही पदवी मिळाली आहे.
धोनीला आर्मीची पहिल्यापासूनच आवड असल्याचे सर्वांना माहित आहे. तो बऱ्याचदा त्याच्या मोकळ्या वेळेत किंवा सुटीमध्ये जवानांबरोबर वेळ घालवताना दिसतो. यामुळेच आज त्याने पदमभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून सैन्यदलाचे आभार मानले आहेत.
त्याने यात म्हटले आहे की ” पदमभूषण मिळणे हे सन्मानाचे आहे आणि हा पुरस्कार सैन्याच्या गणवेशात स्वीकारल्याने त्याचा आनंद १० पटीने द्विगुणित झाला आहे. सैन्याच्या गणवेशात असणाऱ्या सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार कारण आपल्याला आपल्या घटनात्मक अधिकाराने जगता यावे यासाठी ते खूप त्याग करतात.”
https://www.instagram.com/p/BhGTXC-nhqJ/?taken-by=mahi7781
धोनी भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा विश्वचषक, २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली आहे.
त्याला याआधी २००९ मध्ये पदमश्री पुरस्कार मिळाला होता. तसेच २००७ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही त्याचा सन्मान करण्यात आला होता.