fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!

आजच्याच दिवशी(13 नोव्हेंबर) 5 वर्षांपूर्वी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने(Rohit Sharma) वनडेमध्ये 264 धावांची(264 Runs) तुफानी खेळी केली होती. त्याने 2014मध्ये श्रीलंकेविरुद्ध इडन गार्डन, कोलकता येथे चौथ्या वनडे सामन्यात खेळताना 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 264 धावांची खेळी केली होती.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक (Most Runs in an Innings) धावसंख्या ठरली होती. रोहितचे हे वनडेतील दुसरे द्विशतक(Double Century) होते. त्यामुळे तो वनडेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक द्विशतके करणारा पहिला फलंदाज ठरला होता.

रोहित या सामन्यात फलंदाजी करत असतानाच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने(MS Dhoni) एक ट्विट केले होते. हे ट्विट धोनीने रोहित 200 धावांच्या आसपास खेळत असताना केले होते. त्यावेळी धोनीने ट्विट केले होते की ‘जर रोहित बाद झाला नाही तर तो नक्कीच 250 धावांचा टप्पा पार करेल.’

धोनीने केलेली ही भविष्यवाणी काहीवेळातच खरी ठरली आणि रोहितने वनडेमध्ये 250 धावांचा टप्पा पार करत 264 धावांची खेळी केली.

रोहित या सामन्यात भारताच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल नुवान कुलशेकराच्या गोलंदाजीवर माहेला जयवर्धनेने घेतला होता. रोहितने 264 धावांपैकी तब्बल 186 धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या.

विशेष म्हणजे धोनीने रोहितच्या 250 धावांबद्दचा ट्विट करण्याआधी आणखी एक खास ट्विट केला होता. त्यात त्याने रोहितचे कौतुक करताना म्हटले होते की ‘रोहित खूप मस्त फलंदाजी केलीस. तूमच्या सर्वांसाठी हा आहे रोहित. तुझ्याकडे प्रतिभा आहे. तूझ्या या शानदार खेळीचा मी साक्षीदार असून मी या खेळीची मजा घेतली.’

धोनीच्या या ट्विटवर रोहितने दुसऱ्या दिवशी(14 नोव्हेंबर 2014) प्रतिक्रिया देताना लिहिले होते की ‘धन्यवाद धोनी.’

2014 ला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या या वनडे मालिकेत त्यावेळेचा भारताचा नियमित कर्णधार धोनी खेळला नव्हता. त्यामुळे त्याच्याऐवजी विराट कोहलीने भारताचे नेतृत्व केले होते.

या मालिकेतील चौथ्या सामन्यात रोहितच्या 264 धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 404 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकाचा डाव 43.1 षटकांत 251 धावांतच आटोपला आणि श्रीलंका संघ 153 धावांनी पराभूत झाला.

You might also like