संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी कर्णधार एमएस धोनीची भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. आता त्याच्या नियुक्तीनंतर त्याच्या मानधनाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
धोनी मार्गदर्शकाच्या पदासाठी कोणतेही मानधन बीसीसीआयकडून घेणार नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की ‘एमएस धोनी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून त्याच्या सेवेसाठी कोणतेही मानधन घेणार नाही.”
धोनी नव्या भूमीकेत
आजपर्यंत प्रत्येकाने धोनीला फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधाराच्या रुपात पाहिले आहे. पण आता पहिल्यांदाच भारतीय संघाचा मार्गदर्शकाच्या भूमीकेत चाहत्यांना को दिसणार आहे.
टी२० विश्वचषकाचे यंदाचे सातवे पर्व आहे. यापूर्वी झालेल्या सर्व ६ टी२० विश्वचषकात एमएस धोनी खेळला होता. विशेष म्हणजे तो सर्व ६ टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार होता. पण आता तो मार्गदर्शक असेल.
धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून भारताला ३ आयसीसीच्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो २०१९ विश्वचषकात अखेरचा भारतीय संघाकडून खेळला होता. पण आता जवळपास २ वर्षांनंतर पुन्हा एकदा धोनी भारतीय संघासह दिसणार आहे.
धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त
धोनी सध्या आयपीएल २०२१ हंगामात खेळत असून त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरला या हंगामाच्या अंतिम सामन्यात धोनी खेळताना दिसेल. त्यानंतर तो टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात दाखल होईल.
हा आयपीएलचा हंगाम १५ ऑक्टोबर रोजी संपल्यानंतर भारतीय खेळाडू टी२० विश्वचषकासाठी एकत्र येतील. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान संघाविरुद्ध होईल.
असा आहे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
पालथ्या घड्यावर पाणी! सलग दुसऱ्या वर्षी बेंगलोर एलिमिनेटरमध्ये पराभूत; नावावर ‘हा’ नकोसा विक्रम
केएल राहुल पंजाब किंग्ज संघाला ठोकणार रामराम? चर्चेला उधाण