इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे. या हंगामाचा पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) खेळवला जाणार आहे. १० संघात होणाऱ्या या हंगामात एकूण ७४ सामने होणार आहेत, यातील ७० सामने साखळी फेरीत, तर ४ प्लेऑफचे सामने असतील. दरम्यान, हा हंगाम चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी याचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा आहे. यात आता त्याच्यानंतर चेन्नईचे नेतृत्त्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो, यावर आता माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने आपले मत मांडले आहे.
आयपीएलला २००८ सालापासून सुरुवात झाली, तेव्हापासून धोनी चेन्नईचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने चारवेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच ९ वेळा अंतिम फेरीही गाठली आहे. आता यंदा आयपीएलच्या १५ व्या हंगामात देखील तो चेन्नईचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. पण धोनी आता ४० वर्षांचा झाला असल्याने तो फार काळ आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता चेन्नईला लवकरच धोनीचा उत्तराधिकारी (MS Dhoni’s successor) शोधावा लागणार आहे.
धोनीच्या उत्तराधिकाबद्दल स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात रैनाने मत व्यक्त करताना सांगितले की, ‘सीएसकेमध्ये (CSK) रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्रावो सारखे खेळाडू आहेत, जे धोनीचे उत्तराधिकारी होऊ शकतात. हे खेळाडूही सक्षम आहेत आणि खेळ चांगला समजतात. पण, मला वाटते की या शर्यतीत जडेजा पुढे जाऊ शकतो.’
जडेजा चेन्नई संघातील महत्त्वाचा खेळाडू
रैना (Suresh Raina) चेन्नई संघातील रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) धोनीचा उत्तराधिकारी म्हणून सर्वात जास्त विश्वास दाखवला आहे. यामागे जडेजाची मागील काही वर्षांतील कामगिरीही मोठे कारण असू शकते. त्यातच जडेजाला चेन्नईने आयपीएल २०२२ साठी १६ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे. त्यामुळे अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा चेन्नई संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच गेल्या काही दिवसांत जडेजा चेन्नईचा भविष्यातील कर्णधार होऊ शकतो, अशा चर्चाही समोर आल्या होत्या. दरम्यान, चेन्नईकडून मात्र, याबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
रैना करणार समालोचन
सुरेश रैना यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. तो २००८ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला, तर २०१६ आणि २०१७ साली तो गुजरात लायन्स संघाचा भाग होता. मात्र, रैनाला २०२२ आयपीएलआधी चेन्नईने संघातून मुक्त केले. तसेच त्याला लिलावात कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही. त्यामुळे ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा रैना यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. असे असले तरी रैना यंदा आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेसन रॉयवर दंडासहित २ सामन्यांची बंदी! इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून कडक कारवाई
आयपीएल २०२२ सामन्यांच्या तिकीट विक्रीला कधी होणार सुरुवात? घ्या जाणून