महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात भारताच्या मानस धामणे, आर्यन शहा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत मुलांच्या गटात रुशील खोसला व युवान नांदल या जोडीने विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित पुण्याच्या मानस धामणे याने तिसऱ्या मानांकित युवान नांदलचा 6-3, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. हा सामना २ तास ६मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मानसने सुरेख सुरुवात करत पाचव्या गेममध्ये युवानची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या युवानयाने जोरदार पुनरागमन करत पहिल्याच गेममध्ये मानसची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये त्याने वर्चस्व राखत मानसची तिसऱ्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मानसने वेगवान खेळ करत युवानची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत आपली आघाडी कायम ठेवली. अखेर मानसने नवव्या गेममध्ये युवानची पुन्हा सर्व्हिस भेदून हा सेट 6-3 असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत सहाव्या मानांकित आर्यन शहा याने दुसऱ्या मानांकित अमन दहियाचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(4) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अस्मी आडकर व वैष्णवी आडकर या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या इमर्सन जोन्स व लिली टेलर यांचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत रुशील खोसला व युवान नांदल या चौथ्या मानांकित भारतीय जोडीने कोरियाच्या वूह्युक चांग व जपानच्या रिया हत्तोरीचा 7-6(4) 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक, प्रशस्तिपत्रक व 225गुण, उपविजेत्या जोडीला करंडक, प्रशस्तिपत्रक व 157गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा सहसंचालक आश्विन गिरमे, पीएमडीटीएचे हिमांशु गोसावी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: (उपांत्य फेरी): मुले:
मानस धामणे (भारत) [5] वि.वि.युवान नांदल (भारत) [3] 6-3, 3-6, 6-3;
आर्यन शहा(भारत) [6] वि.वि अमन दहिया (भारत) [2] 6-2, 7-6(4);
दुहेरी: अंतिम फेरी: मुले:
रुशील खोसला (भारत) /युवन नंदल (भारत) [4] वि.वि. वूह्युक चांग (कोरीया)[3]/रिया हत्तोरी (जपान)7-6(4) 6-3
मुली: उपांत्य फेरी:
लिली फेअरक्लॉ (ऑस्ट्रेलिया) /झारा लार्के (ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि. श्रुती अहलावत (भारत) /यु-युन ली (तैपेई) [1] 6-1, 1-0सामना सोडून दिला;
अस्मी आडकर (भारत) /वैष्णवी आडकर(भारत) वि.वि.इमर्सन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [2]/लिली टेलर(ऑस्ट्रेलिया)6-4, 6-2;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितची रिप्लेसमेंट तयार! रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फलंदाजाने ठोकले नाबाद द्विशतक
दिल्ली-मुंबई जडेजाला आपल्या संघात घेण्यास उत्सुक; सीएसकेने दिले हे उत्तर