पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा अंतिम सामना गुरुवारी (२४ जून) पार पडला. या सामन्यात पेशावर जाल्मी आणि मुलतान सुलतान हे संघ आमने सामने होते. या मोठ्या सामन्यात मुलतान सुलतान संघाने ४७ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा विजेते होण्याचा मान पटकावला आहे.
या सामन्यात पेशावर जाल्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुलतान सुलतान संघाकडून शोएब मक्सुदने अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली होती. तसेच रीली रोसोव याने अवघ्या २१ चेंडूत ५० धावा चोपल्या होत्या. यासोबतच शान मसूदने २९ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर अंतिम सामन्यात, मुलतान सुलतान संघाने २० षटकअखेर ४ बाद २०६ धावा केल्या होत्या. (Multan sultans got this much price money after being champions of PSL 2021)
या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर जाल्मी संघाकडून सलामी फलंदाज कामरान अकमलने चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने २८ चेंडूत ३६ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच शोएब मलिकने २८ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले होते. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. परंतु इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे पेशावर जाल्मी संघाला २० षटकअखेर ९ बाद अवघ्या १५९ धावा करता आल्या.
या सामन्यात मुलतान सुलतान संघाने ४७ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात ६५ धावांची खेळी करणाऱ्या शोएब मक्सुदला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दोन्ही संघांना बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली?
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवणाऱ्या, मुलतान सुलतान संघाला ७५ मिलियन पाकिस्तानी रुपये (३.५ कोटी रुपये) रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. तर उपविजेते पेशावर जाल्मी संघाला ३० मिलियन पाकिस्तानी रुपये (१.५ कोटी रुपये) रक्कम बक्षीस देण्यात आले आहे. तर मालिकावीर ठरलेल्या शोएब मक्सुदला पाकिस्तानी रुपये ३ मिलियन (१४.१ लाख रुपये) रक्कम बक्षीस मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अन् चॅलेंज पूर्ण करताच ‘गब्बर’ने आनंदाने केला डान्स, पण सूर्यकुमारने ‘असे’ म्हणत घेतले क्रेडिट
‘ही तुमची गोलंदाजी करण्याची पद्धत आहे? हे अतिशय अपमानास्पद होते,’ विश्वविजेता खेळाडू भडकला