आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (12 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. सूर्यकुमार यादव याच्या तुफानी शतकानंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 27 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबईच्या या विजयात अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याचे महत्त्वाचे योगदान राहिले. या सामन्यानंतर बोलताना त्याने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला.
मागील वर्षी कोणीही खरेदी न केलेल्या पियुष चावलाने यावेळी हंगामात मुंबई इंडियन्सने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. त्याने शानदार पुनरागमन करत आत्तापर्यंत स्पर्धेत 19 बळी आपल्या नावे केले. गुजरातविरुद्ध देखील 4 षटकात 36 धावा देऊन दोन बळी त्याने टिपलेले.
आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला,
“मी माझ्या मुलासाठी खेळत आहे. ज्यावेळी मी कारकिर्दीच्या शिखरावर होतो तेव्हा तो खूप लहान होता. त्याला क्रिकेट समजत नव्हते. आता मी कसा खेळलो याबाबत तो मला सांगतो.”
स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे मुंबईसाठी गरजेचे होते. मुंबईने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर या सामन्यात विजय खेचून आणला. नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 218 धावा काढल्या होत्या. मुंबईसाठी अनुभवी सूर्यकुमार यादव याने अवघ्या 49 चेंडूत नाबाद 103 धावांचे योगदान दिले. त्याला ईशान किशन व विष्णू विनोदी यांनी साथ दिलीय. तर, गुजरातसाठी राशिद खान याने चार बळी मिळवले. मोठ्या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या मुख्य फलंदाजांना डाव उभा करता आला नाही. मात्र, राशिद खान याने 32 चेंडूवर 79 धावा चोपत अखेरपर्यंत एकाकी झुंज दिली. परंतु, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. नाबाद शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(Mumabai Indians Leggy Piyush Chawala Said I Play For My Son )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला हरवण्यासाठी राशिद खानने मारले तब्बल 10 षटकार, पण सूर्याच्या शतकामुळे मुंबईच विजयी
सूर्याचा स्पेशल सिक्स! शेवटच्या चेंडूवर साकारले पहिले आयपीएल शतक