मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी मुंबई सिटी एफसी आणि बेंगळुरु एफसी यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांनी आधीचा सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांना विजयाची प्रतिक्षा आहे.
मुंबईला घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 0-1, तर बेंगळुरूला दिल्ली डायनॅमोजविरुद्ध 0-2 असे पराभूत व्हावे लागले. मुंबई पहिल्या चार संघांत पुन्हा स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांना विजयाची गरज आहे. दुसरीकडे बेंगळुरूला जिंकल्यास आघाडी घेता येईल.
ब्लास्टर्स आणि एटीके हे संघ मुंबईच्या फार मागे नाहीत. त्यामुळे मुंबईला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांना याची जाणीव आहे. ते म्हणाले की, संघाच्या कामगिरीचा विचार केल्यास प्रगती होत असल्याचे दिसते.
काही वेळा निकालामधून तसे दिसत नाही. आता आम्ही अशा स्थितीत आहोत की आम्हाला पुन्हा सावरून कामगिरी उंचावण्याची गरज आहे. पिछाडीवर राहणारा संघ संपून जातो. आम्ही तसे होऊ देणार नाही. पहिल्या चार संघांत स्थान मिळविण्यासाठी आम्ही सर्वस्व पणास लावून झुंज देऊ.
आधीच्या लढतीत मुंबईला 0-2 असे पराभूत व्हावे लागले होते. त्या तुलनेत संघाची कामगिरी सुधारल्याचा विश्वास गुईमाराएस यांना वाटतो. ते म्हणाले की, पहिल्या लढतीत खूप वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला चांगला खेळ करता आला नाही. बेंगळुरूचा संघ विजयास पात्र होता. त्या सामन्यानंतर आम्ही संघबांधणी करीत आहोत.
आमच्या खेळाची शैली परिणामकारक असून बाद फेरी गाठण्याची संधी असलेल्या आठ संघांमध्ये आम्ही टिकून आहोत. आयएसएल ही चुरशीची स्पर्धा आहे. तुम्हाला दक्ष राहावे लागते. काहीही घडू शकते. संघाची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आम्ही तेच करीत आहोत.
बेंगळुरूला हरवायचे असेल तर मुंबईला वेगळ्या उंचीवर खेळ न्यावा लागेल. अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूचा संघ पदार्पणात लक्षवेधी खेळ करतो आहे. साहजिकच त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील सामना गमावला असला तरी चिंता करण्याची काहीच कारण नसल्याचे रोका यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, असे घडते, कारण हा मोसम छोटा आहे. तुमच्याकडे दर्जा असेल तर पुन्हा जिंकणे सोपे असते.
बेंगळुरूची सुरवातीपासून संभाव्य विजेते अशी गणना होत असल्यामुळे संघावर अतिरीक्त दडपण असल्याचे रोका यांना वाटते. त्यांनी सांगितले की, आम्हाला निकालांमध्ये संतुलन साधावे लागेल. आम्ही दोन सामने जिंकले आणि मग हरलो, तेवढे पुरेसे नसते.
संभाव्य विजेते असे विशेषण चांगले नसते. तुम्ही प्रत्येक सामना जिंकाल असे लोक म्हणत असतात. त्यामुळे खेळाडूंवर जास्त दडपण येते. असे असले तरी आमच्याकडे चांगला खेळ करण्याइतका दर्जा आहे.
सामन्याबद्दल रोका म्हणाले की, चुरशीचा खेळ होईल. आम्हाला अनुकूल निकाल साधण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.