मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग 2022-23 च्या ( आयएसएल) पर्वात अपराजित मालिका कायम राखताना चेन्नईयन एफसीचा शनिवारी (24 डिसेंबर) पराभव केला. मुंबई सिटीने पिछाडीवरून मुसंडी मारताना 2-1 अशा विजयाची नोंद केली अन् पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली. पीटर स्लिस्कोव्हिचच्या गोलनंतर चेन्नईयनच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण होते, परंतु चार मिनिटांत मुंबई सिटीच्या लालिंआझुआला छांग्टेने त्यांना जमिनीवर आणले. दुसऱ्या हाफ मध्ये ग्रेग स्टीवर्टच्या गोलने मुंबईला फ्रंटसीटवर बसवले अन् यजमानांनी सामन्यावरील पकड गमावली नाही. यंदाच्या पर्वात मुंबई सिटीने दुसऱ्यांदा चेन्नईयन एफसीला पराभूत केले. पहिल्या लढतीत मुंबईने 6-2 असा दणदणीत विजय मिळवला होता. मुंबई सिटीचा हा यंदाच्या पर्वातील सलग सहावा विजय ठरला अन् त्यांनी 27 गुणांसह पुन्हा अव्वल स्थान पटकावले.
मुंबई सिटी एफसीची यंदाच्या पर्वातील घोडदौड पाहता चेन्नईयनला त्यांना रोखणे जरा अवघडच वाटत होते आणि आकडेवारीही मुंबई सिटीच्या बाजूने आहेच. आजच्या लढतीपूर्वी हिरो आयएसएलमध्ये दोन संघांमध्ये झालेल्या 17 सामन्यांत मुंबईने 8, तर चेन्नईयनने 6 विजय मिळवले होते. मुंबई सिटीने आक्रमक सुरुवात करताना गोल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते, परंतु पहिले यश चेन्नईयनला मिळाले. पहिल्या 30 मिनिटांच्या खेळात सामन्यात फार काही घडत नसल्याचे दिसत असताना चार मिनिटांत धडाधड दोन गोल झाले. 34 व्या मिनिटाला ज्युलियस ड्युकेरच्या पासवर पीटर स्लिस्कोव्हिचने गोल करत चेन्नईयनला आघाडी मिळवून दिली. 38व्या मिनिटाला यजमानांकडून पलटवार झाला. मौर्ताडा फॉलच्या क्रॉसवर लालिंआझुआला छांग्टेने बरोबरीचा गोल केला.
मध्यंतरानंतर फॉलकडून मुंबईला आघाडी मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न होताना दिसले. फॉलच्या चुकीमुळे चेन्नईयनला गोल करता आला होता आणि ती चूक सुधारण्याचा त्याचा प्रयत्न दिसला. 56व्या मिनिटाला बिपिन सिंगने मुंबई सिटीसाठी गोल करण्याचा प्रयत्न अगदी थोडक्यात अयशस्वी ठरला. चेंडू अगदी जवळून गेला. पण, मुंबई सिटीने हार नाही मानली. बिपीनने डाव्या बाजूने चेंडू परेरा डिएझकडे टोलवला अन् त्याने चतुराईने तो ग्रेग स्टीवर्टकडे दिला. त्याने 57व्या मिनिटाला चेन्नईयनचा गोलरक्षक समिक मित्राला संधी न देता मुंबई सिटीसाठी दुसरा गोल केला. 64व्या मिनिटाला अनिरुद्ध थापाने बरोबरीची सोपी संधी गमावली अन् त्यामुळे चेन्नईयनचे खेळाडू त्याच्यावर निराश दिसले. पुढच्याच मिनिटाला मुंबई सिटीने काऊंटर अटॅक केला अन् यावेळेस गोलरक्षक मित्राने तो अडवला.
FT: MCFC 2⃣-1⃣ CFC
3 points at home. Truly a very Merry Christmas indeed💙#TheIslanders are back to the 🔝 of the #HeroISL table 🤩#MCFCCFC #MumbaiCity #AamchiCity🔵 pic.twitter.com/3pqEuYjXHH
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) December 24, 2022
चेन्नईयन एफसीकडून आता बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न होताना दिसले अन् 72व्या मिनिटाला त्यांचे खेळाडू पेनल्टी क्षेत्रात चेंडू चांगले खेळवताना दिसले. हा गोल होणार होताच, परंतु मुंबई सिटीचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपाने योग्यवेळी चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर मुंबईने पुन्हा आक्रमणाला सुरुवात केली अन् चेंडू चेन्नईयनच्या पेनल्टी क्षेत्रात घेऊन शिरले. 85व्या मिनिटाला विक्रम सिंगने मुंबई सिटीसाठी एक सोपी संधी गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीव्ही सिंधू झळकली फोर्ब्सच्या यादीत, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘या’ स्थानावर
विराटचा कसोटी शतकाचा दुष्काळ तिसऱ्या वर्षीही कायम, मागच्या 10 डावांमध्ये नाही केले एकही अर्धशतक