गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील महत्त्वपूर्ण लढतीत मुंबई सिटी एफसीने बेंगळुरू एफसीवर 3-1 असा भारदस्त विजय मिळविला. याबरोबरच मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला मागे टाकून गुणतक्त्यात आघाडी पटकावली. मुंबई सिटीचा हा सलग तिसरा विजय आहे, तर बेंगळुरूला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. मुंबई सिटीकडून बचाव फळीतील सेनेगलचा 33 वर्षीय खेळाडू मुर्तडा फॉल याने नवव्याच मिनिटाला खाते उघडले, तर 15व्या मिनिटाला मध्य फळीतील मणीपूरचा 25 वर्षीय खेळाडू बिपीन सिंग याने दुसरा गोल केला. मध्यंतराला मुंबई सिटीकडे ही दोन गोलांची आघाडी कायम होती. दुसऱ्या सत्रात बेंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्री याने पेनल्टी सत्कारणी लावत पिछाडी कमी केली, पण त्यानंतर मुंबई सिटीकडून बदली स्ट्रायकर म्हणून मैदानावर उतरलेल्या नायजेरियाच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने संघाचा तिसरा गोल करीत तीन गुणांसह आघाडीवरही धडाक्यात शिक्कामोर्तब केले.
स्पेनचे सर्जिओ लॉबेरा प्रशिक्षक असलेल्या मुंबई सिटीचा हा 9 सामन्यांतील सातवा विजय असून एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 22 गुण झाले. त्यांनी एटीके मोहन बागानला दोन गुणांनी मागे टाकून आघाडी घेतली. एटीकेएमबीचे 9 सामन्यांतून सहा विजयांसह 20 गुण आहेत. एफसी गोवा तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 9 सामन्यांतून 14 गुण आहेत. जमशेदपूर एफसी 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेंगळुरुला 9 सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण व पाचवे स्थान कायम राहिले.
खाते उघडण्याची शर्यत मुंबई सिटीने जिंकली. नवव्या मिनिटास मिळालेल्या कॉर्नरवर बिपीनने फार सफाईने फटका मारला नव्हता. मध्य फळीतील हर्नान सँटाना याने उडी घेत हेडिंग केले. हा चेंडू बेंगळुरूचा मध्यरक्षक हरमनज्योत खाब्रा याला लागून नेटच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बेंगळुरूचा बचावपटू जुआनन याला चकवून त्याच्यापेक्षा उंच उडी घेत मुर्तडाने हेडिंग करून बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकवित चेंडू नेटमध्ये घालवला.
त्यानंतर 15व्या मिनिटाला सँटानाने चेंडूवर ताबा मिळवून मुसंडी मारली. त्याने आघाडी फळीतील अॅडम ली फाँड्रे याला सरळ पास दिला. अॅडमने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवून डावीकडील बचावपटू मंदार राव देसाई याच्या दिशेने चेंडू मारला. मंदारने बॉक्समध्ये क्रॉस शॉट मारला. त्यावेळी बिपीनने वेगाने धावत येत चपळाईने फिनिशींग केले.
77व्या मिनिटाला बेंगळुरूचा मध्यरक्षक क्लेईटन सिल्वाला पेनल्टी क्षेत्रात चेंडू मिळाला. त्यावेळी त्याला मुर्तडाने रोखले. सिल्वा मैदानावर पडताच रेफरी सी. रामस्वामी श्रीकृष्ण यांनी बेंगळुरूला पेनल्टी बहाल केली. त्यावर छेत्रीने अफलातून फटका मारत मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याला चकवले.
सहा मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीला कॉर्नर मिळाला. बदली मध्यरक्षक सी गोडार्ड याने हा कॉर्नर घेताच ओगबेचे याने हेडिंग केले. संधूने सुरवातीला चेंडू थोपवला, पण चेंडूचा टप्पा मैदानावर पडताच तो गडबडला. परिणामी चेंडू नेटमध्ये गेला. चार मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीचा अहमद जाहू याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले, पण याचा निकालावर आणि पर्यायाने मुंबई सिटीच्या विजयावर परिणाम झाला नाही.
बेंगळुरूने दुसऱ्याच मिनिटाला प्रयत्न केला होता. त्यावेळी मध्यरक्षक क्लेईटन सिल्वा मुंबई सिटीचा मध्यरक्षक अहमद जाहू याला चकवून उजवीकडून स्ट्रायकर देशोर्न ब्राऊन याला पास दिला, पण ब्राऊनने स्वैर फटका मारल्यामुळे चेंडू नेटमागील स्टँडमध्ये गेला. 41व्या मिनिटाला क्लेईटन सिल्वाने घेतलेल्या फ्री किकवर अमरींदरने मुंबई सिटीचे नेट सुरक्षित राखले. दुसऱ्या सत्रात 50व्या मिनिटाला बेंगळुरूचा मध्यरक्षक डिमास डेल्गाडो याने बदली स्ट्रायकर उदांता सिंग याच्या दिशेने क्रॉस शॉट मारला, पण मंदारने तो रोखला. 54व्या मिनिटाला सुनील छेत्रीने दिलेल्या पासवर आघाडी फळीतील क्रिस्तीयन ओप्सेथ याने प्रयत्न केला, पण त्याचा फटका स्वैर होता.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका
SA vs SL : सांघिक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, मी स्टीव्ह स्मिथला कोचिंग करत नाही, कारण