गोवा, दिनांक 16 जानेवारी ः हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आघाडीवरील मुंबई सिटी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील चुरशीची लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. मुंबई सिटीने आघाडी वाढविली. 11 सामन्यांत त्यांची दुसरीच बरोबरी असून आठ विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 26 गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचा एक सामना बाकी आहे. एटीके मोहन बागानचे 10 सामन्यांत सहा विजयांसह 20 गुण आहेत. एफसी गोवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोव्याने 11 सामन्यांत पाच विजयांसह 18 गुण कमावले आहेत.
स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटाला सलामीच्या लढती नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मुंबई सिटीने सलग चार विजय मिळविले. मग जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांची 1-1 अशी बरोबरी झाली. मग त्यांनी पुन्हा चार विजयांची मालिका नोंदविली. सलामीच्या लढतीचा अपवाद सोडल्यास मुंबई सिटीला गोल करण्यात प्रथमच अपयश आले. स्पर्धेतील सहभागी संघांमध्ये त्यांनी सर्वाधिक 17 गोल नोंदविले आहेत.
हैदराबादने चौथे स्थान कायम राखले. 11 सामन्यांत त्यांची चौथी बरोबरी झाली असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. पाचव्या क्रमांकावरील चेन्नईयीन एफसीपेक्षा ते दोन गुणांनी पुढे आहेत. चेन्नईयीनची 11 सामन्यांत तीन विजय व पाच बरोबरींसह 14 गुण अशी कामगिरी आहे.
हैदराबादने सुरुवात चांगली केली. आघाडी फळीतील लिस्टन कुलासोने उजवीकडे चेंडू मारला. त्याला रोखणे मुंबईचा बचावपटू मंदार राव देसाई याला भाग पडले. त्यामुळे हैदराबादला फ्री किक मिळाली, जी मध्यरक्षक महंमद यासीरने घेतली. त्याने बॉक्समध्ये मारलेला फटका हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याच्यापाशी जाऊ नये म्हणून मुंबई सिटीचा मध्यरक्षक रॉलीन बोर्जेस याने हेडिंगने बाहेर घालविला.
तेराव्या मिनिटाला मुंबई सिटीला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक बिपीन सिंगने घेतला. त्याने बचावपटू मुर्तडा फॉल याच्या दिशेने चेंडू मारला. त्यानंतर मुर्तडाने पास दिल्यावर अहमदने केलेला प्रयत्न मात्र अचूक नव्हता. 16व्या मिनिटाला लिस्टनने चाल रचत हैदराबादचा हुकमी स्ट्रायकर अरीडेन सँटाना याला पास दिला. त्यातून जोएल चायनेस याला संधी मिळाली. त्याने चेंडू परत लिस्टनकडे सोपविला. त्यावेळी बॉक्समध्ये दाखल झालेल्या लिस्टनने मारलेला फटका मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने रोखला. त्यानंतर लिस्टन आणि जोएल यांचे काही प्रयत्न अमरींदरने फोल ठरविले.
45व्या मिनिटाला मुंबई सिटीचा स्ट्रायकर अॅडम ली फाँड्रे याला मध्य क्षेत्रात चेंडू मिळाला. हैदराबादचा मध्यरक्षक हितेश शर्माचा प्रतिकार मोडून काढत त्याने फटका मारला, पण चेंडू थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्याकडे गेला.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी मुंबईचा मध्यरक्षक सी गोडार्ड याने बॉक्समध्ये प्रवेश करीत उजवीकडे अॅडमला पास दिला. अॅडमने बिपीनला पास देण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. 53व्या मिनिटाला अॅडमला चेंडू मिळताच त्याने मध्यरक्षक रेनीयर फर्नांडीस याला पास दिला. त्याच्याकडून पुन्हा चेंडू मिळवित चाल रचण्याचा प्रयत्न मात्र हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्राने रोखला.
63व्या मिनिटाला लिस्टनच्या चपळाई आणि कौशल्यामुळे मुंबईचा बदली मध्यरक्षक विघ्नेश दक्षिणामूर्ती याच्याकडून कॉर्नर गेला. मध्यरक्षक लुईस सॅस्त्रे याने घेतलेल्या कॉर्नरवर सँटानाला संधी मिळाली. त्याचा हेडर मात्र अमरींदरने आरामात अडविला. 73व्या मिनिटाला मुंबईचा बदली स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याला मध्य क्षेत्रात चेंडू मिळाला. त्याने उजवीकडे रेनीयरला पास देत स्वतः ब़ॉक्सच्या दिशेने आगेकूच केली. त्याचवेळी ओदेईच्या प्रतिकारामुळे ओगबेचेला चेंडू हेडिंगवर बाहेर घालवावा लागला.
अखेरच्या काही मिनिटांत मुंबई सिटीने जोरदार प्रयत्न केले. 87व्या मिनिटाला अॅडमने चेंडूवर ताबा मिळवित बदली मध्यरक्षक विक्रमप्रताप सिंग याला पास दिला. विक्रमप्रतापला मात्र चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्राने चेंडूवर ताबा मिळविला. एक मिनिट बाकी असताना अहमदने प्रतिस्पर्ध्यांच्या प्रयत्नांना दाद लागू न देता आगेकूच केली. त्याने ओगबेचेला पास दिला. ओगबेचेने मारलेला फटका नेटच्या वरील भागात लागला. त्यावेळी ओगबेचेकडून अधिक अचूक कामगिरी अपेक्षित होती.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालची आज केरला ब्लास्टर्सविरुद्ध लढत
आयएसएल २०२०: जमशेदपूरविरुद्ध गोव्याचा महत्त्वाचा विजय
आयएसएल २०२०-२१ : ओदिशाला हरवून चेन्नईयीनची आगेकूच