गोवा| मुंबई सिटी एफसीच्या आक्रमणाची बुधवारी (१५ डिसेंबर) चेन्नईयन एफसीनं कसोटी पाहिली. हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) आजचा सामना आक्रमण विरुद्ध बचाव असा रंगला अन् त्यात चेन्नईयनचा बचाव भारी ठरला. चेन्नईयनचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या बचाव भिंतीनं मुंबई सिटी एफसीचे आक्रमण कुचकामी ठरवले होते. पण, ८६व्या मिनिटाला ही भिंत ढासळली अन् राहुल भेकेनं हेडरद्वारे गोल करताना मुंबई सिटीचा विजय पक्का केला. गतविजेत्या मुंबई सिटी एफसीचा हा सलग चौथा विजय ठरला अन् गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड त्यांनी अधिक घट्ट केली.
आयएसएलच्या या पर्वात सर्वाधिक १६ गोल नावावर असलेल्या मुंबई सिटी एफसीनं स्पर्धेत सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांत ११ गोल केले आहेत. ही आकडेवारी लक्षात ठेऊनच चेन्नईयन एफसीनं त्यांची बचावफळी सुरुवातीपासूनच भक्कम केली. ९व्या मिनिटाला अमेर रानावडेनं कॉर्नरवरून उंच उडवलेला चेंडू अडवण्यासाठी चेन्नईयन एफसीचा गोलरक्षक विशाक कैथ त्याची पोझिशन सोडून पुढे आला, परंतु मुंबईच्या इगोर अँगुलोनं हेडरद्वारे चेंडू गोलजाळीच्या दिशेनं तटवला. पण, चेंडू गोलपोस्टजवळून गेला. कैथची ही घाई चेन्नईयनला महागात पडली असती. २२व्या मिनिटाल अँगुलोचा आणखी एक प्रयत्न थोडक्यात चुकला. यंदाच्या आयएसमधील हा पहिला सामना ठरला की ज्यात मुंबईला पहिल्या १५ मिनिटांत गोल करण्यात अपयश आले. अँगुलोचे दोन प्रयत्न वगळल्यास या सत्रात फार रोमांच पाहायला मिळाला नाही.
दुसऱ्या हाफमध्ये दुसऱ्याच मिनिटाला मुंबई सिटी एफसीच्या ढिसाळ बचावाचा चेन्नईयन एफसीनं जवळपास फायदा उचललाच होता. जेरी लाल्रीझुआलाचा पास अडवण्यात मुंबईच्या बचावपटूला अपयश आलं अन् पेनल्टी बॉक्समध्ये उभ्या असलेल्या लुकाज गिकिएविचनं तो गोलजाळीत धाडलाच होता. पण, तो चेंडूला अंतिम टच देणार तितक्यात मुंबईचा गोलरक्षक मोहम्मद नवाज चेंडूवर झेपावला अन् गतविजेत्या मुंबईनं सुटकेचा निश्वास टाकला. तीन फुटांवरून हा गोल करण्यात अपयश आल्यानं गिकिएविच निराश दिसला. चेन्नईयनचा बचाव भेदण्यात मुंबईला सातत्यानं अपयश येत होते आणि त्यामुळे त्यांच्या ताफ्यात किंचितशी निराशा पसरली होती.
६८व्या मिनिटाला मुंबईनं दोन बदल करताना रायनियर फर्नांडेस व इगोर अँगुलो यांच्याजागी विक्रम सिंग व इगोर कॅटाटाऊ यांना मैदानावर उतरवले. ७०व्या मिनिटाला या दोघांनी मुंबईसाठी गोल करण्याची संधी निर्माण केली, परंतु गोलरक्षक कैथनं तितकाच जबरदस्त तो अडवला. कॅसिओ गॅब्रिएलनं मारलेला चेंडू कैथनं अडवला. या सामन्यात कैथचा खेळ उल्लेखनीय ठरला. ८६व्या मिनिटाला अहमद जोहुहनं फ्री किकवर मारलेला चेंडू अडवण्यासाठी कैथ पुढे आला अन् त्याच्या जवळच उभ्या असलेल्या राहुल भेकेनं हेडरद्वारे चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. संपूर्ण सामन्यात केलेल्या मेहनतीवर कैथनंच पाणी फिरवले. मुंबई सिटी एफसीनं १-० असा विजय पक्का केला.
निकाल – मुंबई सिटी एफसी १ ( राहुल भेके ८६ मि. ) विजयी विरूद्ध चेन्नईयन एफसी – ०
महत्त्वाच्या बातम्या-
‘विनलेस’ ईस्ट बंगालविरुद्ध खेळ उंचावण्यास नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी उत्सुक
पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत