गोवा, दिनांक १४ डिसेंबर – चेन्नईयन एफसी संघाची हिरो इंडियन सुपर लीग ( आयएसएल) मधील कामगिरी ही चढउताराची राहिली आहे. आयएसएसलच्या यंदाच्या पर्वात चेन्नईयन एफसी अपराजित राहिला आहे, परंतु बुधवारी त्यांना गतविजेत्या मुंबई सिटी एफसीच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मुंबई सिटी एफसीनं पाच सामन्यांत चार विजय मिळवले आहेत आणि मागील तीनही सामने त्यांनी जिंकले आहेत. मुंबई सिटी १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे चेन्नईयन एफसीला चार सामन्यांत दोन विजय मिळाले आहेत आणि दोन लढती अनिर्णित राहिल्या आहेत. चेन्नईयन एफसी ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबई सिटी एफसीनं मागील सामन्यात जमशेदपूर एफसीवर ४-२ असा विजय मिळवला. त्यांनी पहिल्या २५ मिनिटांत ३-० अशी आघाडी घेत आपला दम दाखवला. इगोर अँगुलो हा भन्नाट फॉर्मात आहे, त्याला कॅसिओ गॅब्रिएल, अहमद जाहोह आणि मोर्ताडा फॉल यांची तगडी साथ मिळतेय आणि हे खेळाडू म्हणजे डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटी एफीचा पाठीचा कणाच आहेत. मुंबईनं फतोर्डा स्टेडियमवर १६ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ९मध्ये विजय मिळवले आहेत. त्यांनी एकूण २९ गोल्स येथे केले आहेत.
पण, मुंबईसमोर स्पर्धेतील भक्कम बचाव असणाऱ्या चेन्नईचे आव्हान आहे. या पर्वात सर्वाधिक १६ गोल्स करण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर असला तरी चेन्नईनं आतापर्यंत प्रतिस्पर्धींना केवळ दोनच गोल करू दिले आहेत. यावरून त्यांचा बचाव किती अभेद्य आहे, याची कल्पना येते. ”आम्ही एकावेळी एकाच सामन्याचा विचार करतो. पहिल्या सामन्यातील कामगिरी आम्हाला दुसऱ्या सामन्यात कायम राखता आली नाही. पण, त्याचवेळी दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर आम्ही सालग तीन विजय मिळवले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. आमच्यासमोर लीगमध्ये अपराजित संघ असणार आहे आणि तो सामना नक्कीच आव्हानात्मक असेल,”असे बकिंगहॅम म्हणाले.
चेन्नईयन एफसीची बचावफळी मजबूत असली तरी आक्रमणपटूंचे अपयश त्यांची डोकेदुखी ठरतेय. लुकास्ज गिकिविज याला गोल करता न येणं, हा संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. एससी ईस्ट बंगालविरुद्ध गिकिविजनं गोलं करण्याची सोपी संधी गमावली होती. ”आम्हाला प्रत्येक सामन्याचा विचार करून रणनिती आखायला हवी. आम्हाला आणखी चांगली कामगिरी करायला हवी आणि अपराजित राहणे हे पुरेसे नाही. यश मिळवायचे असेल तर खेळात स्थिरता आणायला हवी, सातत्य राखायला हवं. ही वाटचाल अशीच कायम राखायला हवी, परंतु त्याचवेळी विजयाचीही आम्हाला गरज आहे,”असे चेन्नईयनचे प्रशिक्षक बोझिदार बँडोव्हिच यांनी सांगितले.