नुकताच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामना तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. ज्यामध्ये तामिळनाडू संघाचा फलंदाज शाहरुख खान याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत तामिळनाडू संघाला जेतेपद मिळवून दिले होते. आता लवकरच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईचा संघ घोषित करण्यात आला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी २० सदस्यीय खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद शम्स मुलानीच्या हाती देण्यात आले आहे. तर यशस्वी जयस्वाल सारख्या विस्फोटक फलंदाजाचा देखील समावेश करण्यात आला आहे. शम्स मुलानीने यापूर्वी देखील मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई संघाने ओमानचा दौरा केला होता. त्यावेळी वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शम्स मुलानीला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांसारखे खेळाडू सध्या भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे हे खेळाडू विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध नसणार आहेत. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सिद्धेश लाडचाही मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, सरफराज खानचा समावेश करण्यात आलेला नाही. तो भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तसेच २०१६ मध्ये वेस्टर्न रेल्वे संघाकडून खेळताना टाइम्स शिल्ड स्पर्धेत एकाच षटकात ६ षटकार मारणाऱ्या अष्टपैलू खेळाडू सागर मिश्राला देखील या संघात स्थान देण्यात आले.
तसेच अनुभवी अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचाही मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने मधल्या फळीत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच गोलंदाजीत धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांच्यावर जबाबदारी असेल. याशिवाय इतरही अनेक दिग्गज गोलंदाज आहेत.
असा आहे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ
शम्स मुलानी (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, आकर्षित गोमेल, सागर मिश्रा, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोर, प्रसाद पवार, तनुश कोटियन, प्रशांत सोलंकी, सैराज पाटिल, अमन खान, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी , तुषार देशपांडे, आतिफ अत्तरवाला, दीपक शेट्टी आणि परीक्षित वलसांगकर