काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2027 च्या हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून झहीर खान याची नियुक्ती केली. आता मुंबई इंडियन्सने गुरूवारी (24 सप्टेंबर) मोठी घोषणा केली आहे. त्यांनी महिला प्रीमियर लीग 2027 च्या हंगामासाठी ल्युक विल्यम्स यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू असलेले विल्यम्स, लिसा केटली यांच्याकडून पदभार स्वीकारतील. केटली हे शार्लोट एडवर्ड्स यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर केवळ एका हंगामानंतर पायउतार झाले आहेत.
46 वर्षीय विल्यम्स यांनी प्रशिक्षणातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांनी जगभरातील तीन प्रमुख स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या संघांचा भाग म्हणून काम केले आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग (2022, 2023 – ऍडलेड स्ट्रायकर्स), इंग्लंडमधील द हंड्रेड (2023, सदर्न ब्रेव्ह) आणि भारतातील डब्ल्यूपीएल (2024, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 2025 मध्ये इंग्लंड महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
विल्यम्स यांनी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर म्हटले, “या प्रतिष्ठित आणि यशस्वी संघात सामील होताना आणि खेळाडूंच्या व सपोर्ट स्टाफच्या या प्रतिभावान गटासोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे.”
“आपल्या सर्वांना मिळून काहीतरी उभारण्याची, रोमांचक क्रिकेट खेळण्याची आणि यशासाठी स्पर्धा करण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. मी या आव्हानासाठी आणि आमच्या चाहत्यांना अभिमान वाटावा असे बरेच काही देण्यासाठी उत्सुक आहे,” असेही विल्यम्स यांनी पुढे म्हटले आहे.
विल्यम्स यांच्या नियुक्तीबाबत एमआयच्या मालक नीता अंबानी म्हणाल्या, “आम्हाला ल्यूक विल्यम्सचे मुंबई इंडियन्स परिवारात स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. ल्यूक एक सिद्ध विजेता असून, तो आपल्यासोबत समृद्ध अनुभव, महिलांच्या खेळाची सखोल जाण आणि खेळाडूंच्या विकासासाठी असलेली दृढ वचनबद्धता घेऊन आला आहे.”
“आमच्या मुलींनी डब्ल्यूपीएलमध्ये एक अभिमानास्पद वारसा निर्माण केला आहे आणि मला खात्री आहे की, ल्यूकच्या मार्गदर्शनाखाली आणि हरमनच्या नेतृत्वाखाली, त्या पुढेही प्रगती करत राहतील, अधिक मोठे यश मिळवतील आणि जगभरातील तरुण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा देतील. आपण एकत्र या रोमांचक नव्या पर्वाची सुरुवात करत असताना, मी ल्यूक आणि संपूर्ण संघाला खूप खूप शुभेच्छा देते,” असे नीता यांनी म्हटले आहे.
हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलच्या चारपैकी दोन हंगाम, 2023 आणि 2025 मध्ये, जिंकले आहेत. (Mumbai Indians Appoint New Head Coach Luke Williams for the WPL 2027)






