आगामी काळात पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची (Odi WC 2027) चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. सर्व संघांनी या स्पर्धेची तयारीही सुरू केली आहे. वर्ल्ड कपचे यजमान देश आणि ठिकाणांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. आता सर्वांना वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. याबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.
दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आलेली आहे. रिपोर्टनुसार, वर्ल्ड कप 2027च्या आयोजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, लवकरच स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.
आयसीसीच्या बैठकीमध्ये स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. आता वर्ल्ड कपच्या अंतिम आराखड्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आयसीसी 1 ऑक्टोबर रोजी पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर करू शकते. पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कप 2027 च्या फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कपचे आयोजन झाले होते. मागील दोन वर्ल्ड कपमध्ये 10 संघांनी सहभाग घेतला होता. मात्र, यावेळी 14 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आयसीसीने स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला आहे.
स्पर्धेची सुरुवात सुपर सीरीजने होईल. यामध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर असलेले तीन संघ मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील. या तीन संघांपैकी केवळ एका संघाला मुख्य फेरीसाठी पात्र ठरता येईल, तर उर्वरित दोन संघ स्पर्धेतून बाहेर होतील.
सुपर सीरीजमधून पात्र ठरणारा एक संघ आणि इतर 11 संघ असे मिळून एकूण 12 संघ दुसऱ्या फेरीत खेळतील. या 12 संघांची सहा-सहा अशा दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल.
वर्ल्ड कप 2027 मध्ये एकूण 54 सामने खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तिन्ही देशांमध्ये सामने होतील. यापैकी सर्वाधिक सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील किंग्समीड क्रिकेट ग्राउंड (डरबन), वांडरर्स स्टेडियम (जोहान्सबर्ग), सेंचुरियन (त्शवाने), न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड (केप टाउन), सेंट जॉर्ज पार्क (गकेबरहा), मंगांग ओव्हल (ब्लोमफोंटेन), बोलँड पार्क (पार्ल) आणि बफेलो पार्क येथे सामने खेळवले जातील. तसेच, नामिबियातील नामिबिया क्रिकेट ग्राउंड (विंडहोक) येथेही सामने होणार आहेत.
याशिवाय झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब (हरारे), क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (बुलावायो) आणि मोसी-ओआ-तुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (व्हिक्टोरिया फॉल्स) येथेही वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. आता आयसीसी स्पर्धेचं वेळापत्रक नेमकं कधी जाहीर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे .






