२१ मे… हा दिवस मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी खूप विशेष ठरला होता. याचे कारण असे की, आजच्या दिवशी २०१७मध्ये मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरले होते. हैद्राबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने फक्त एका धावेने राइजिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत केले होते. यावरुनच कळून येते की, तो सामना किती रोमांचक झाला असेल. याबरोबर तेव्हा आयपीएलमध्ये तीन विजेतेपद जिंकणारा मुंबई पहिला संघ ठरला होता. Mumbai Indians beat rising pune supergiant in ipl 2017 final on this day.
यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सलामीला फलंदाजी करण्यासाठी गेलेले सिमन्स आणि पार्थिव पटेल हे अनुक्रमे ३ आण ४ धावांवर बाद झाले होते. त्यानंतर अनुभवी फलंदाज अंबाती रायडू हा १२ धावांवर बाद झाला. तर, रोहितने २२ टेंडूत २४ धावा केल्या होत्या. ५व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याने सर्वाधिक ४७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या योगदानाने मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सच्या १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राइजिंग पुणे सुपरजायंट्सची सुरुवात खराब झाली होती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने राहुल त्रिपाठीला केवळ ३ धावांवर बाद केले होते. त्यानंतर राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणेने मिळून ५७ चेंडूत ५४ धावांची भागिदारी केली होती. कमी धावांचे लक्ष्य असल्यामुळे आरपीएस संघाची रणनिती ही विकेट वाचवून खेळण्याची होती. मात्र, वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनने रहाणेला ४४ धावांवर बाद केले होते.
त्यानंतर फलंदाजीसाठी एमएस धोनी मैदानावर उतरला होता. १७व्या षटकात धोनी आणि स्मिथ मिळून खेळत होते. आरपीएसला आता मोठे शॉट्स मारण्याची आवश्यकता होती. मात्र, या षटकातच बुमराहने धोनीला १० धावांवर बाद करत सामन्याला आपल्या बाजूने करुन घेतले. तरीही स्मिथ खेळपट्टीवर उपस्थित होता. त्यामुळे एमआयला थोडा तणाव होता. शेवटच्या २ षटकात आरपीएसला विजयासाठी २३ धावांची आवश्यकता होती. म्हणून बुमराहने आक्रमक गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
डावातील १९वे षटक टाकणाऱ्या बुमराहच्या ५व्या चेंडूवर स्मिथने जबरदस्त षटकार मारत संपूर्ण षटकात १२ धावा केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या षटकात आरपीएसला ११ धावा करायच्या होत्या. स्मिथ असताना आरपीएसला विजय मिळवणे शक्य होते. रोहितने सामन्यातील शेवटचे षटक जॉनसनला गोलंदाजीसाठी दिले होते. यावेळी स्टाईकवर असणाऱ्या मनोज तिवारीने जॉनसनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. त्यामुळे एमआयला मोठा धक्का बसला होता.
परंतु, पुढील चेंडूवर जॉनसनच्या चेंडूवर कायरन पोलार्डने तिवारीचा झेल पकडत त्याला ७ धावांवर बाद केले होते. लगेच तिसऱ्या चेंडूवर स्मिथही झेलबाद झाला होता. शेवटी सामना आरपीएसच्या हातातून निसटताना दिसत होता. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी आरपीएसला फक्त ४ धावांची गरज होती. म्हणून अष्टपैलू क्रिकेटपटू डेन क्रिश्चियन पळत ३ धावा घेऊन सामना बरोबरीवर आणण्याच्या प्रयत्नात होता.
पण, क्रिश्चियनला यश आले नाही. एमआयच्या जगदीश सुचितच्या वेगवान थ्रोमुळे धाव घेत असणारा वॉशिंग्टन सुंदर बाद झाला आणि फक्त एका धावेच्या फरकाने एमआयने अंतिम सामना खिशात घातला. हा एमआयचा रोहितच्या नेतृत्त्वाखालील तिसरा विजय होता. त्यापुर्वी एका वर्षांच्या फरकाने म्हणजे २०१३ आणि २०१५ मध्ये एमआयने २ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मुंबईने हा विजय मिळवत ३ आयपीएल विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरण्याचा इतिहास रचला होता. त्यांच्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सने प्रत्येकी २ विजेतेपदं मिळवली होती.
#OnThisDay in 2017 ➡️ 🏆🏆🏆
A recollection of the events that transpired into a thrilling one-run victory in the IPL 2017 final 🤩👌#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/D9t4ZfeX2K
— Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2021
सध्या मुंबईकडे आयपीएलची ५ विजेतेपदं आहेत, तर चेन्नईकडे ४ विजेतेपदं आहेत. हे दोन संघ सर्वाधिक आयपीएल विजेतीपदं जिंकणाऱ्या संघांच्या यादीत अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंचवीस वर्षांपूर्वी चेपॉकवर घडलेला इतिहास, भारताविरुद्ध ‘या’ फलंदाजाने केलेली तुफान फटकेबाजी
बॉलर नहीं, फिनिशर हू मैं! अश्विनने राजस्थानला मिळवून दिलं ‘क्वालिफायर १’चं तिकीट, होतंय कौतुक
राजस्थानच्या चेन्नईवरील विजयाने लखनऊला धक्का, फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी संजूपुढे गुजरातचे आव्हान