Jonny Bairstow Salary for 2 matches of IPL 2025: यंदाचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. (Indian Premier League 2025) रविवारी (1 जून) मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पंजाब किंग्जने आयपीएल 2025च्या फायनलमध्ये धडक मारली. यादरम्यानच आयपीएल हा केवळ क्रिकेटचा नाही तर पैशांचाही खेळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अनेक स्टार खेळाडूंना संधी दिली होती. दरम्यान महत्त्वाच्या प्लेऑफ सामन्यांसाठी मुंबईने इंग्लंडच्या जाॅनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून 5 कोटी 25 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. मात्र, त्याची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्सला प्रत्येक धावेसाठी किती रूपये मोजावे लागले याबद्दल आपण जाणून घेऊयात.
आयपीएल 2025च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई इंडियन्ससाठी जॉनी बेअरस्टोने 2 महत्त्वपूर्ण सामने खेळले. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने मिळून केवळ 85 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचा आर्थिक हिशोब मांडल्यास, मुंबई इंडियन्सने त्याला प्रत्येक सामन्यासाठी 2 कोटी 62 लाख 50 हजार रुपये मोजले आहेत.
याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, त्याने केलेल्या प्रत्येक धावेसाठी मुंबई इंडियन्सला प्रचंड मोठी रक्कम मोजावी लागली आहे. बेअरस्टोने केलेल्या 85 धावांसाठी मुंबईने एकूण 5 कोटी 25 लाख रुपये खर्च केले. याचा सरळ अर्थ असा की, मुंबई इंडियन्सने जोनी बेअरस्टोला त्याच्या प्रत्येक धावेसाठी तब्बल 6 लाख 17 हजार 647 रुपये दिले आहेत. (Mumbai Indians bought Jonny Bairstow for Rs 5.25 crore)






