इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे पाच वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने १३ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात १० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात राहुल चहरने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. तसेच आता मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षकाने राहुल चहरचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुल चहरने ४ षटकात २७ धावा देत ४ गडी बाद केले होते. या प्रदर्शनानंतर मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडने म्हटले आहे की, “तो (राहुल चहर) खूप चांगली कामगिरी करत आहे. जर तुम्ही त्याला पाहाल तर तो युवा खेळाडू आहे. त्याने खूप क्रिकेट खेळले आहे. तो आमच्या संघातील एक प्रमुख सदस्य आहे. त्याने अनेकदा दबाव असलेल्या सामन्यात खेळून संघाला सामने जिंकून दिले आहेत. त्याला अजून चांगली कामगिरी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मला आशा आहे की, तो येणाऱ्या काळात संघासाठी चांगली कामगिरी करेल. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “राहुल चहरच्या भूमिकेत कधीच बदल येत नाही. संघाला नेहमी असेच वाटते की, त्याने फलंदाजाला बाद करण्यासाठीच गोलंदाजी करावी. आमच्याकडे पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे स्ट्राईक गोलंदाज आहेत. पण राहुल चहर गडी बाद करणारा (विकेट टेकर) गोलंदाज आहे.”
मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद संघासोबत १७ एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्याबाबत बोलताना शेन बाँड म्हणाला, “जॉनी बेअरस्टो आणि डेविड वॉर्नर यांना लवकरात लवकर बाद करणे गरजेचे असेल. वॉर्नर हा आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी आहे. तो त्यांच्या संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आम्हाला माहीत आहे की, या दोन्ही खेळाडूंना बाद करणे किती महत्वाचे आहे. ”
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान ‘हाई वोल्टेज’ सामन्यांचा थरार, पाहा कधी आणि कोठे होणार मॅच
CSKvPBKS: दीपक चहरच्या ‘क्लास’ प्रदर्शनाची बहिण मालतीने केली स्तुती, म्हणाली…