भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला एका सामन्याच्या बंदीसह 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली. सामन्यात स्लो ओव्हर रेट राखण्याची मुंबईची ही हंगामातील तिसरी चूक आहे, ज्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर बंदी घालण्यात आली.
आता हार्दिक पांड्यावरील ही बंदी आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात लागू होईल, कारण या हंगामात मुंबई इंडियन्सचे कोणतेही सामने शिल्लक नाहीत. हार्दिक पांड्या पुढच्या हंगामात मुंबईचा भाग नाही राहिला तरी देखील त्याच्यावर ही बंदी कायम राहील. हार्दिक पांड्याशिवाय बीसीसीआयनं संघातील इतर खेळाडूंनाही मोठा दंड ठोठावला आहे.
आयपीएलनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील तिसरा गुन्हा होता, ज्यामुळे पांड्याला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला पुढील सामन्यात खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअरसह उर्वरित मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हनला देखील वैयक्तिकरित्या 12 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के, यापैकी जे कमी असेल, तेवढा दंड ठोठावण्यात आलाय.
आयपीएल 2024 मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे बंदीचा सामना करणारा हार्दिक पांड्या हा दुसरा कर्णधार आहे. त्याआधी बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवरही स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्याची बंदी घातली होती. या बंदीमुळे पंत आरसीबीविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळू शकला नव्हता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 214 धावा केल्या. राहुलनं 55 धावांची तर पूरननं 75 धावांची तुफानी खेळी खेळली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मानं 68 धावांची झंझावाती खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही. अखेरीस नमन धीरनं 28 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही. मुंबई केवळ 196 धावांच करू शकली.
महत्त्वाच्या बातम्या –
निकोलस पूरननं धो-धो धुतलं! मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी मोठं लक्ष्य
विश्वचषक संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूला गौतम गंभीरचा सल्ला; म्हणाला, “तुझ्याकडे खूप अनुभव, पण…”