आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कार्बिन बॉशने (Corbin Bosch) आता आपल्या राष्ट्रीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने झिम्बाब्वेच्या विरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये शानदार खेळी केली. त्याने तब्बल 23 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. यामुळे आता जॅक कॅलिस, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनसारख्या महान खेळाडूंमध्ये त्याचं नाव सामील झालं आहे. बॉशने याआधी आयपीएलमध्येही उत्तम प्रदर्शन केलं होतं.
दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात कार्बिन बॉशने पहिल्या डावात उत्कृष्ट खेळी करत 124 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार ठोकले. मात्र पहिल्या डावात गोलंदाजीमध्ये त्याला विशेष काही करता आलं नव्हतं. दुसऱ्या डावात त्याने 36 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने 5 विकेट घेतल्या. याचसोबत बॉशने तब्बल 23 वर्षांचा दुष्काळही संपवला. गेल्या 23 वर्षांत असा विक्रम करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. एकाच कसोटी सामन्यात शतकी खेळी आणि 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. याआधी हा विक्रम 2002 मध्ये जॅक कॅलिसने बांगलादेशविरुद्ध केला होता.
कार्बिन बॉशने हा कारनामा करून महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. भारतीय संघाकडून ही कामगिरी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), रविचंद्रन अश्विन (R Ashwin), पॉली उमरीगर आणि वीनू मांकड यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी असा पराक्रम करणारा बॉश हा चौथा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध ल्हुआन ड्रे प्रीटोरियस आणि वियान मुल्डर यांनीही शतक केलं आहे. मुल्डरने गोलंदाजी करताना 4 विकेट घेतल्या.






