आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीएलचे कही संघ यूएई दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघही सहभागी आहे. मुंबईच्या संघात यावर्षी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सहभागी झाला आहे. त्याचा एक नवीन व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. व्हिडिओत अर्जुन जोरदार सराव करतोय आणि घाम गाळत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे.
मैदानावर अर्जुन तेंडुलकची उत्कृष्ट गोलंदाजी
अर्जुन मुंबईच्या संघासोबत यूएईमध्ये सराव करताना दिसला आहे. तो या व्हिडिओत दक्षिण अफ्रिकेचा ६ फूट ८ इंच येवढी उंची असलेला २१ वर्षीय मार्काे जेनसनसोबत सराव करत आहे. सरावदरम्यान तो स्टंप्सवर चेंडू मारण्यासोबतच याॅर्कर चेंडू टाकण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. अर्जुन ज्याप्रकारे गोलंदाजी करताना दिसत आहे, ते अप्रतिम आहे.
तो दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजापेक्षा चांगली गोलंदाजी करत आहे. त्याचे सर्व चेंडू एकदम योग्य लेंथवर पडत आहेत. सरावादरम्यान एकदा यार्कर टाकून त्याने सर्वानाच हैराण केले आहे. त्याचे सर्व यार्कर चेंडू अगदी योग्य जागेवर पडतात आणि ते पाहून असे वाटते की, जसप्रीत बुमराह किंवा लसिथ मलिंगाच गोलंदाजी करत आहेत.
यापर्षीच्या हंगामात अर्जुन आयपीएलमध्ये करू शकतो पदार्पण
आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राइज देऊन विकत घेतले होते. आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या टप्यात म्हणजेच भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यात तर त्याला संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, त्याचा सध्याचा चांगला फाॅर्म पाहता त्याला हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात यूएईमध्ये सामना खेळण्याची संधी मिळू शकते. तो या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. मुंबई इंडियन्सने त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणामुळे यावर्षीच्या हंगामात गुणतालिकेत चौथे स्थान कायम ठेवले आहे.
मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२१ मधील प्रदर्शन
मुंबई इंडियंन्सने आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या टप्यात ७ सामने खेळले आहेत आणि यातील ४ सामन्यात संघाने विजय मिळवला असून ३ सामने हरले आहेत. संघ ८ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.