श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. मदुशंकाला मुंबई इंडियन्सनं लिलावात तब्बल 4.60 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आता त्याच्या आयपीएल 2024 मध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे. दुखापतीमुळे मदुशंका पुनर्वसन करण्यावर भर देईल. श्रीलंका क्रिकेटनं ही माहिती शेअर केली आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई इंडियन्स किंवा आयपीएलकडून मदुशंकाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सध्या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान मदुशंकाला दुखापत झाली. त्याचे स्नायू ताणले गेले. त्यामुळे मदुशंकाला सामना संपण्यापूर्वीच मैदान सोडावं लागलं. श्रीलंका क्रिकेटनं त्याच्या दुखापतीविषयी माहिती शेअर केली आहे. श्रीलंका क्रिकेटनं ट्विटरवर लिहिलं, “दिलशान मदुशंका दुखापतीमुळे भविष्यातील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तो आता पुनर्वसनावर भर देईल.”
मदुशंकाची दुखापत हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे. तो सध्या फॉर्मात होता. तसेच त्यानं संघासाठी अनेकदा धारदार गोलंदाजी केली होती. त्यामुळेच मुंबई इंडियन्सनं त्याला लिलावात 4.60 कोटी रुपयांना खरेदी केलं. मदुशंकाची मूळ किंमत केवळ 50 लाख रुपये होती. हा त्याचा आयपीएलचा डेब्यू सीजन असणार होता. पण आता त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग किंवा मुंबई इंडियन्सकडून अद्याप मदुशंकाच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
मदुशंकाच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर ती चमकदार राहिली आहे. त्यानं 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान 24 धावांत 3 बळी ही सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मदुशंकानं 23 एकदिवसीय सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत.
नुकताच दिल्ली कॅपिटल्सचा आघाडीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला होता. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्कचा संघात समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लक्ष्य सेनचं स्वप्न भंगलं, ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर प्रशिक्षक आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…