आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केल्यानंतर, मुंबईच्या संघाला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. आता त्यांचा पुढचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे, ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत पंजाब किंग्सला पराभूत करणे मुंबई इंडियन्ससाठी सोपे नसेल. मात्र, आता मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी भर पडताना दिसत आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा कदाचित खेळू शकणार नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगला (स्नायूंना) दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर रोहित पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला नाही. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा कणा आहे आणि त्याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. आता ‘TOI’ ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीबाबत काही स्कॅन केले जातील. त्यानंतरच त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होईल.
या रिपोर्टमध्ये असाही खुलासा झाला आहे की, 16 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात रोहितच्या खेळण्यावर सस्पेन्स (शंका) कायम आहे. जर त्याचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आला, तरच तो मैदानात उतरू शकतो. दरम्यान, स्पर्धा नुकतीच सुरू झाली असल्याने मुंबई इंडियन्स आपला स्टार खेळाडू रोहितबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स त्याला एका सामन्यासाठी विश्रांती देऊ शकते. त्यामुळे रोहितचे पंजाब विरुद्ध खेळणे सध्या कठीण दिसत आहे.
जर रोहित शर्मा पंजाब किंग्स विरुद्ध खेळला नाही, तर क्विंटन डी कॉकची संघात एन्ट्री होऊ शकते. त्याच्यासाठी ट्रेंट बोल्ट किंवा मिचेल सँटनरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. तसेच, मुंबई इंडियन्स धडाकेबाज सलामीवीर दानिश मळेवारला देखील संधी देऊ शकते. यामुळे मुंबईला त्यांचे इतर कॉम्बिनेशन बदलण्याची गरज पडणार नाही. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सूर्यकुमार यादवचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्याने यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर म्हणून भूमिका बजावली आहे.






