शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला ८ विकेट्सने पराभूत केले. यासह मुंबईने प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवल्या. राजस्थानकडून मिळालेले ९१ धावांचे आव्हान मुंबईने ८.२ षटकातच पूर्ण केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सने मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद धावांचा पाठलाग करण्याच्या यादीत मुंबईचा हा विजय पाचव्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे या यादीत अव्वल क्रमांकावरही मुंबईचे नाव आहे. मुंबई इंडियन्सने २००८ साली कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले ६८ धावांचे आव्हान ५.३ षटकांत पूर्ण केले होते. त्यामुळे २००८ सालचा मुंबईचा विजय या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
याशिवाय आयपीएलमध्ये धावांचे लक्ष्य १० षटकांच्या आत दोनवेळा पूर्ण करणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद धावांचा पाठलाग करणारे संघ –
५.३ षटके – मुंबई इंडियन्स (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २००८)
७.२ षटके – कोची टस्कर्स केरला (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०११)
७.५ षटके – पंजाब किंग्स (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१७)
८.१ षटके – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (विरुद्ध पंजाब किंग्स, २०१८)
८.२ षटके – मुंबई इंडियन्स (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२१)
मुंबईसाठी विजय ठरला महत्त्वाचा
राजस्थानविरुद्धचा सामना मुंबई संघासाठी करो या मरो अशा परिस्थितील सामना होता. पण, मुंबईने हा सामना जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मुंबईचे सध्या गुणतालिकेत ६ विजयांसह १२ गुण झाले आहेत. ते सध्या ५ व्या क्रमांकावर आहेत.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यात वर्चस्व ठेवले. त्यामुळे राजस्थानला २० षटकांत ९ बाद ९० धावाच करता आल्या.
राजस्थानकडून एविन लूईसने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने २० धावांचा टप्पा ओलांडला नाही. मुंबईकडून नॅथन कुल्टर-नाईलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जिमी निशामने ३ विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून इशान किशननेही अफलातून कामगिरी केली. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. तसेच रोहित शर्माने २२, सूर्यकुमार यादवने १३ आणि हार्दिक पंड्याने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान आणि चेतन साकारीयाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ‘असं’ झालं! मुंबईने ९ षटकातच विजय मिळवल्याने राजस्थानवर ओढावली नामुष्की