---Advertisement---

आयपीएलचा दादा संघ !! आयपीएलचे शानदार विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबईचा आजपर्यंतचा प्रवास

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 11:05 PM
---Advertisement---

जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या प्रतिक्षेत असतो. यामागचे कारण, उन्हाळाच्या सुट्ट्या वगैरे नाही बर का? ती प्रतिक्षा असते, ‘इंडियन प्रिमीयर लीग’ची. होय, सर्वांच्या आवडत्या ‘आयपीएल’ची.

२००८ साली क्रिकेट जगतात एन्ट्री मारलेल्या या टी२० लीगची ओढच तशी आहे. एकाच देशातील क्रिकेटपटूंना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे, चौकार-षटकारांचा वर्षाव, सामन्याच्या अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत विजय मिळवण्यासाठी होणारी चुरस अशा कित्येक गोष्टी चाहत्यांना आयपीएल पाहायला प्रेरित करतात. त्यातही विशेष खेळाडू किंवा संघाने त्यांच्या प्रदर्शनाने चाहत्यांच्या मनावर आपले नाव कोरलेले असते. त्यामुळे काही चाहते तर एकट्या खेळाडूला किंवा संघाला खेळताना पाहण्यासाठी आयपीएल पाहतात.

आयपीएलमध्ये आजवर कित्येक संघ आले आणि गेले, तर कित्येक संघ पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत टिकून आहेत. त्या संघांपैकी एक संघ म्हणजे, मुंबई इंडियन्स. एक दोन नव्हे तर, तब्बल चार वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या या संघाची चाहत्यांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. याच मुंबई संघाचा गेल्या १३ वर्षांतील प्रवास आम्ही येथे मांडला आहे. चला तर पाहूया..

पहिल्या हंगामाची सुरुवात पाचव्या स्थानापासून

२००८ या लीप वर्षात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलची सुरुवात केली. आयपीएलच्या या पहिल्या हंगामात भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्या हातात मुंबई इंडियन्सच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली होती. परंतु, त्यावेळी संघाला जास्त चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. कारण मुंबई संघ पहिल्या हंगामात प्लेऑफपर्यंतही मजल मारु शकला नव्हता. त्यांनी हंगामातील १४ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले होते. तर ७ सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे १४ गुणांसह साखळी फेरीअखेर त्यांनी गुणतक्यात पाचवे स्थान मिळवले होते.

दुसऱ्या हंगामात तर मिळवले खालून तिसरे स्थान

पहिल्या हंगामात संघाला प्लेऑफपर्यंतही मजल मारता आली नाही. यंदा तरी हा किर्तीमान मिळवावा, या उद्देशाने मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कर्णधार म्हणून नियुक्त केले. परंतु, फलंदाजीचा बादशहा म्हणून संबोधला जाणारा सचिन नेतृत्त्वात मात्र सपशेल फ्लॉप ठरला. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात मुंबईची पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर घसरण झाली होती. त्यावेळी त्यांनी हंगामातील १४ सामन्यांपैकी केवळ ५ सामने जिंकले होते. तर ८ सामन्यात पराभव आणि एक सामना अनिर्णीत सोडत त्यांनी ११ गुण मिळवले होते.

तिसऱ्या हंगामात मोठी भरारी

भलेही नेतृत्त्वाच्या पहिल्या वर्षात संघावर प्लेऑफपर्यंत न पोहोचण्याची नामुष्की ओढवली असली. तरी या हंगामात मात्र संघाच्या वाट्याला विजेतेपद आणायचे, या हेतूने सचिन तेंडूलकर उतरला असावा. कारण आयपीएल २०१०मध्ये म्हणजेच तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ फक्त प्लेऑफपर्यंत पोहोचला नाही. तर त्यांनी अंतिम सामन्यातही मजल मारली होती. परंतु, चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात त्यांचा विजयरथ रोखला. त्यामुळे मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

चौथ्या हंगामात पटकावले तिसरे स्थान

आयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई संघाचे प्रदर्शन चांगले राहिले होते. सचिन तेंडूलकरच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघ साखळी फेरीअखेर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. त्यांनी हंगामातील १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले होते. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशाप्रकारे १८ गुणांसह त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु, अंतिम सामन्यात पोहोचण्यात त्यांना यश आले नाही.

पाचव्या हंगामात स्थिती ‘जशास तशी’ 

चौथ्या हंगामाप्रमाणे आयपीएलच्या पाचव्या हंगामातही मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. २०१२ सालच्या पूर्ण हंगामात त्यांनी १६ सामने खेळले होते. त्यातील १० सामन्यात त्यांचा विजय आणि ६ सामन्यात पराजय झाला होता. अशाप्रकारे २० गुणांसह त्यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. पण ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

सहाव्या हंगामात ठरला विजेतेपदाचा मानकरी

आयपीएलचा सहावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खूप खास ठरला. याच हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने पहिल्यांदा ट्रॉफी पटकावली होती. पूर्ण हंगामात खेळलेल्या १६ सामन्यांपैकी ११ सामन्यात विजय आणि ५ सामन्यात पराजय मिळवत त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर प्लेऑफमधील क्वालिफायर सामन्यातही बाजी मारत चेन्नई सुपर किंग्सविरुद्धची अंतिम लढाई जिंकली.

सातव्या हंगामात गाडी डगमगली

आयपीएल २०१४मध्ये मुंबईने पूर्ण हंगामात १४ सामने खेळले होते. त्यातील ७ सामने जिंकत आणि ७ सामने पराभूत होत त्यांनी कसाबसा गुणतालिकेत चौथा क्रमांक मिळवला. पण प्लेऑफमधील क्वालिफायर सामन्यात त्यांची गाडी डगमगली. त्यामुळे अंतिम सामन्यात मजल मारण्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.

आठव्या हंगामात दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

२०१५ साली पुन्हा कट्टर विरोधक चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अंतिम सामन्याची रंगतदार लढत झाली. यावेळीही मुंबईने चेन्नईला पराभवाची धूळ चारत दुसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरले. या हंगामात मुंबईने एकूण १४ सामने खेळले असून ८ सामने जिंकले होते. तर ६ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नवव्या हंगामात प्लेऑफपुर्वीच पत्ता कट 

आयपीएल २०१६मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सवर हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी अर्धे सामने जिंकण्याची आणि अर्धे गमावण्याची परिस्थिती ओढावली होती. त्यामुळे १४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला होता. म्हणून त्यांना साखळी फेरीतूनच घरी परतावे लागले.

दहाव्या हंगामात तिसऱ्या विजयाचा डंका 

आयपीएल २०१७मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन नावाजण्याजोगे राहिले होते. त्यांनी पूर्ण हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांतील १० सामने जिंकले होते. तर केवळ ४ सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे साखळीफेरीअखेर अव्वल स्थानावर विराजमान होत, त्यांनी दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. एवढेच नव्हे तर, एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील राइजिंग पुणे सुपरजायंट्सचे अंतिम आव्हान पूर्ण करत तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली होती.

अकरावा हंगाम साखळी फेरीतच समाप्त

अकराव्या हंगामात मुंबई इंडियन्सला हवे तशी कामगिरी करत आली नाही. त्यांनी हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी केवळ ६ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले. अशाप्रकारे १२ गुणांसह गुणतालिकेत त्यांना पाचव्या स्थानावर राहावे लागले. परिणामत प्लेऑफपुर्वीच त्यांना आयपीएलमधून बाहेर पडावे लागले.

बाराव्या हंगामात रचला इतिहास

गतवर्षी म्हणजेच २०१९ साली पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघात आनंदाचे दिवस आले. यावेळी आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला पराभव केला आणि चौथ्यांदा ट्रॉफी जिंकत इतिहास रचला. या हंगामात संघाने साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले होते. तर केवळ ५ सामने गमावले होते.

तेरावा हंगाम 

चढ-उतारांचा सामना करत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०मध्ये अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने पराभूत करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा केला कारनामा.

मुंबई इंडियन्सचा तेरा वर्षांतील प्रवास-
आयपीएल २००८- पाचवे स्थान (१४ सामने, ७ विजय, ७ पराजय, १४ पाँईट)
आयपीएल २००९- सातवे स्थान (१४ सामने, ५ विजय, ८ पराजय, १ अर्निर्णित, ११ पाँईट)
आयपीएल २०१०- अव्वल स्थान, उपविजेता (१४ सामने, १० विजय, ४ पराजय, २० पाँईट)
आयपीएल २०११- तिसरे स्थान (१४ सामने, ९ विजय, ५ पराजय, १८ पाँईट)
आयपीएल २०१२- तिसरे स्थान (१६ सामने, १० विजय, ६ पराजय, २० पाँईट)
आयपीएल २०१३- दुसरे स्थान, विजेतेपद (१६ सामने, ११ विजय, ५ पराजय, २२ पाँईट)
आयपीएल २०१४- चौथे स्थान (१४ सामने, ७ विजय, ७ पराजय, १४ पाँईट)
आयपीएल २०१५- दुसरे स्थान, विजेतेपद (१४ सामने, ८ विजय, ६ पराजय, १६ पाँईट)
आयपीएल २०१६- पाचवे स्थान (१४ सामने, ७ विजय, ७ पराजय, १४ पाँईट)
आयपीएल २०१७- अव्वल स्थान, विजेतेपद (१४ सामने, १० विजय, ४ पराजय, २० पाँईट)
आयपीएल २०१८- पाचवे स्थान (१४ सामने, ६ विजय, ८ पराजय, १२ पाँईट)
आयपीएल २०१९- अव्वल स्थान, विजेतेपद (१४ सामने, ९ विजय, ५ पराजय, १८ पाँईट)
आयपीएल २०२०- अव्वल स्थान, (१६ सामने, ११ विजय, ५ पराजय, १८ पाँईट)

ट्रेंडिंग लेख-

प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा हा ‘छोटू’ म्हणजे मुंबई इंडियन्सची जान आहे जान!!

मुंबईची मुलुखमैदान तोफ! ‘यांचा’ वेग पाहून भल्या भल्या फलंदाजांना फुटतो घाम

दांडीगुल गोलंदाजीचा शेर! मुंबईचा ‘हा’ धुरंधर ठरणार पाचव्या जेतेपदाचा शिल्पकार

महत्त्वाच्या बातम्या-

IPL FINAL: रोहित, धवन, पोलार्ड यांच्याकडे असेल कीर्तिमान स्थापन्याची संधी; पाहा काय आहे खास आकडेवारी

पृथ्वी शॉ आणि ‘त्या’ अभिनेत्रीमध्ये प्रेमसंबंध?, वाढदिवशी दिलेल्या खास शुभेच्छामुळे चर्चेला उधाण

IPL -दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली; असे आहेत अंतिम ११ जणांचे दोन्ही संघ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---