काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडने आयसीसीच्या पहिल्या-वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडच्या या यशात अनेक खेळाडूंचा वाटा होता. त्यात प्रामुख्याने नाव येते ते वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचे. गेल्या काहीवर्षात न्यूझीलंड संघाने मिळवलेल्या यशात बोल्टचे योगदान बहुमुल्य राहिले आहे. त्याने त्याच्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहे. २०१९ विश्वचषकातील उपांत्य सामन्यातही भारतीय फलंदाजांना बोल्टने पळता भूई थोडी केली होती. आज बोल्ट वनडे क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच बोल्टचा आज (२२ जुलै) ३२ वा वाढदिवस आहे. त्याचनिमित्त त्याच्या क्रिकेटमधील प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
कमी वयातच ठरला होता न्यूझीलंडचा सर्वात वेगवान गोलंदाज
‘थंडरबोल्ट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ट्रेंट बोल्टचा जन्म न्यूझीलंडमधील रोटोरुआ या ठिकाणी झाला. ट्रेंटचा मोठा भाऊ जोनो हा देखील क्रिकेटपटू आहे. या दोन्ही भावांची एक वेगळीच गंमत आहे. जोनो उजव्या हाताने गोलंदाजी व डाव्या हाताने फलंदाजी करतो. दुसरीकडे ट्रेंट डाव्या हाताने गोलंदाजी तर उजव्या हाताने फलंदाजी करतो. जोनोने नॉदर्न डिस्ट्रिकसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आहे. ट्रेंट शालेय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता. बोल्टने आपल्या कौशल्याची चिन्हे कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दाखविली, जेव्हा तो १७ वर्षांचा होता, तेव्हा त्याला न्यूझीलंडमधील सर्वात वेगवान युवा गोलंदाज मानले जायचे.
आधुनिक क्रिकेटला सर्वात्तम खेळाडू देणाऱ्या २००८ च्या बॅचचा सदस्य
ट्रेंटने २००७ च्या हंगामात नॉदर्न डिस्ट्रिकसाठी आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटचे मोजकेच सामने खेळले असताना; त्याला न्यूझीलंडच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात स्थान मिळाले. मलेशियात झालेला २००८ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, त्या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंसाठी ओळखला जातो. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जोस हेजलवूड, रवींद्र जडेजा, उमर अकमल, ख्रिस वोक्स हे सर्व खेळाडू या स्पर्धेतून पुढे आले आहेत. केन विल्यमसन, टीम साऊदी, कोरी अँडरसन या खेळाडूंसोबत ट्रेंटदेखील न्यूझीलंड संघात समाविष्ट होता. बोल्टने यजमान मलेशिया विरूद्ध २० धावांत ७ बळी घेत एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती.
दुखापतीमुळे उशिराने झाले आंतरराष्ट्रीय पदार्पण
एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे बोल्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास सज्ज होता. मात्र, त्याच्या मणक्याला दुखापत झाली आणि तो वर्षभरासाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर झाला. याच दरम्यान, त्याने आपल्या गोलंदाजी शैलीत काहीसा बदल केला. दुखापतीनंतर २००९ मध्ये त्याचा न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला. मात्र, त्यावेळी तो आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकला नाही. बोल्टला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी २०११ सालापर्यंत वाट पाहावी लागली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पुढील वर्षी तो आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला.
२०१५ क्रिकेट विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी
बोल्ट आपल्या धारदार गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत होता. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती २०१५ क्रिकेट विश्वचषकातून. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात बोल्टने आपल्या गोलंदाजीचे शिखर गाठले. युवा संघापासून आपला सहकारी असलेल्या टीम साऊदी याच्यासमवेत मिळून त्याने ती स्पर्धा गाजवली. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क इतकेच २२ बळी त्याने मिळवले होते.
विश्वचषक इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामन्यात बोल्टने २७ धावांत ५ ऑस्ट्रेलियन फलंदाज तंबूत पाठवले. दुसऱ्या डावात स्टार्कने सहा बळी मिळवत न्यूझीलंडची वाताहत केली. अखेरचा गडी शिल्लक असताना केन विलियम्सनने षटकार मारून न्यूझीलंडला विजयी केले होते. विलियम्सनने षटकार मारण्यापूर्वी बोल्टने स्टार्कचे दोन यॉर्कर खेळून काढत, न्यूझीलंडला सामन्यात जिवंत ठेवले होते.
आयपीएलची सुरुवातीची वर्ष
जगातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये २०१५ साली त्याला खेळण्याची संधी मिळाली. डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार या वेगवान गोलंदाजांनी परिपूर्ण असलेल्या, सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला ३ कोटी रुपयात आपल्या संघात सामील करून घेतले. त्या हंगामात तो सात सामन्यातून ९ बळी घेऊ शकला. २०१६ हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याच हंगामात सनरायझर्स हैदराबादने आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते. २०१७ आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सने तब्बल ५ कोटी रुपयांची बोली त्याच्यावर लावली. बोल्ट २०१८ आयपीएलमध्ये पुन्हा करोडपती झाला. यावेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग बनला. दोन वर्ष तो दिल्लीच्या वेगवान गोलंदाजीचा भार वाहत राहिला.
मुंबई इंडियन्ससाठी ठरला तारणहार
आयपीएल २०२० चे बिगुल वाजले, तेव्हा मुंबई इंडियन्सने बोल्टला दिल्ली कॅपिटल्सकडून (पूर्वीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) ट्रेड करत आपल्या संघात सामील केले. मुंबई संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला. जसप्रीत बुमराहसोबत मिळून बोल्टने आयपीएल २०२० मध्ये १५ सामन्यात ७.९७ च्या किफायती इकॉनॉमी रेटने २५ बळी आपल्या नावे केले.
मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या इतिहासात विदेशी वेगवान गोलंदाजांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहेत. मुंबईच्या आत्तापर्यंत यशात लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, मिचेल मॅकलेनघन या गोलंदाजांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. त्याच रांगेत बोल्टने आपले नाव लिहिले आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत बनला न्यूझीलंडचा सर्वोत्तम गोलंदाज
बोल्ट २०१५ पासून सलगपणे न्यूझीलंडचा अव्वल गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नील वॅग्नरसह त्याची जोडी जमली. बोल्ट टीम साऊदीसमवेत न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या संघांसाठी लाभदायी ठरला. या दोघांनी न्यूझीलंडला अनेक सामन्यात दिमाखदार कामगिरी करून दिली. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकात तो न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज होता. न्यूझीलंडला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात बोल्टने सिंहाचा वाटा उचलला. अंतिम सामना सुपर-ओव्हरमध्ये गेल्यानंतर न्यूझीलंडकडून हे महत्वपूर्ण षटक टाकण्याची जबाबदारी बोल्टने उचलली. दुर्दैवाने, सुपर-ओव्हर देखील बरोबरीत राहिल्याने, सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले.
बोल्टने न्यूझीलंडसाठी आत्तापर्यंत ७३ कसोटी सामने खेळताना २९२ बळी आपल्या नावे केले आहेत. सोबतच ९३ एकदिवसीय सामन्यात तो १६९ गडी बाद करण्यात यशस्वी झाला आहे. न्यूझीलंडसाठी कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंड संघ सभ्य क्रिकेटपटूंसोबतच चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. वेगवान गोलंदाज असूनही बोल्टचा समावेश जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये होतो.
वाचा-
भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय