महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला मुंबई इंडियन्स संघाच्या रूपात पहिला विजेता मिळाला. पुरुषांच्या मुंबई इंडियन्स संघाप्रमाणेच महिलाच्या संघानेही आपली ताकद दाखवून दिली. सर्वप्रथम अंतिम सामन्याचे तिकीट मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मुंबईने पराभवाचा धक्का दिला. रविवारी (दि. 26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील मुंबईने 7 विकेट्सने विजय साकारला. तसेच, डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेचे पहिले-वहिले विजेतेपद पटकावले.
सामन्याचा थोडक्यात आढावा
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला (Delhi Capitals Women) संघाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 131 धावा केल्या. हे आव्हान मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघाने 19.3 षटकात 3 विकेट्स गमावत 134 धावा केल्या. तसेच, 7 विकेट्सने सामना खिशात घालत डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Being champions? It’s a #OneFamily thing. 💙
WE HAVE WON THE FIRST-EVER WPL! 😎#MumbaiIndians #AaliRe #WPL2023 #DCvMI #WPLFinal #ForTheW pic.twitter.com/rypKFQxiBw
— Mumbai Indians (@mipaltan) March 26, 2023
मुंबईची झुंजार खेळी
मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खास ठरली नाही. मात्र, नंतर मुंबईची गाडी रुळावर आली. मुंबईला पहिले दोन धक्के यास्तिका भाटिया (4 धावा) आणि आणि हेली मॅथ्यूज (13 धावा) यांच्या रूपात अनुक्रमे 13 आणि 23 धावसंख्येवर बसले. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी डाव सांभाळला. त्यांच्यात 72 धावांची भागीदारी झाली. यावेळी हरमनप्रीत 37 धावांवर बाद झाली. मात्र, ब्रंटने शेवटपर्यंत झुंज दिली. ब्रंटने या सामन्यात मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. तिने 55 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. तिच्यासोबत अमेलिया केर हिनेदेखील नाबाद 14 धावांचे योगदान दिले. यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना राधा यादव आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.
शिखा आणि राधाची खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून शिखा पांडे आणि राधा यादव यांनी कौतुकास्पद खेळी केली. संघ शंभर धावांसाठी संघर्ष करत असताना त्यांनी प्रत्येकी 27 धावांचे योगदान दिले. यावेळी दोघींमध्ये 52 धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यांची खेळी व्यर्थ ठरली. दिल्लीकडून सर्वाधिक धावा कर्णधार मेग लॅनिंग हिने केल्या. तिने यावेळी 35 धावांचे योगदान दिले. तिच्याव्यतिरिक्त मारिझाने केप हिने 18 धावा आणि शफाली वर्मा हिने 11 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी आणि तानिया भाटिया यांना शून्यावर तंबूत परतावे लागले.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) हिने शानदार कामगिरी केली. हेलीने 4 षटके गोलंदाजी करताना 2 निर्धाव षटकांसह फक्त 5 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त एलिमिनेटर सामन्यात धमाल कामगिरी करणारी इझी वोंग (Issy Wong) अंतिम सामन्यातही चमकली. वोंगने 4 षटके गोलंदाजी करताना 42 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त, अमेलिया केर हिनेदेखील 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला मुंबई इंडियन्सच्या रूपात पहिला वहिला विजेता संघ मिळाला आहे. या विजयामुळे कदाचित पुरुष मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचाही आत्मविश्वास वाढला असेल. कारण, 31 मार्चपासून आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाला सुरुवात होत आहे. (Mumbai Indians Women won by 7 wkts against delhi capitals wpl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या हेलीचा नाद पराक्रम! 3 विकेट्स काढताच बनली WPLमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज
दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक