मध्य रेल्वेने महिंद्राचा ४१-२८ असा पराभव करीत प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित ” आमदार चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. बी इ जी, आयकर या पुण्याच्या दोन संघा बरोबर नाशिक आर्मीने देखील विजयी सुरुवात केली.
प्रभादेवी येथील मुरारी घाग मैदानावरील मॅटवर सुरू असलेल्या व्यावसायिक पुरुषांच्या अ गटात मध्य रेल्वेने महिंद्राचा १३गुणांनी पराभव करीत दिमाखात बाद फेरी गाठली.
मध्यांतराला २२-१६ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या रेल्वेने उत्तरार्धात जोरदार खेळ करीत हा विजय सोपा केला.श्रीकांत जाधव, विनोद अत्याळकर यांच्या धारदार चढाया, त्याला विराज लांडगे, संदीप कुमार यांची पकडीची साथ यामुळे हा विनय सहज शक्य झाला.
महिंद्राच्या अजिंक्य पवार, शेखर तटकरे यांची आज मात्रा चालली नाही.
क गटात पुण्याच्या बी इ जीने बँक ऑफ इंडियाचे आव्हान ३४-१८असे संपविले. पूर्वार्धात चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पुण्याकडे १५-१०अशी आघाडी होती.
नंतर मात्र राजकुमार, गौतम, नरेंद्र, रवींद्र यांनी आक्रमक खेळ करीत सामना मोठ्या फरकाने खिशात टाकला. अक्षय उगाडे, सुरज सूतके या बँकेच्या खेळाडूंना सूर सापडला नाही.
या दुसऱ्या पराभवाने बँकेचे या स्पर्धेतील आव्हान संपले.
ड गटात पुण्याच्या आयकरने युनियन बँकेवर ४१-२१ अशी मात केली. या दुसऱ्या पराभवाने बँकेचा या स्पर्धेतील प्रवास येतेच थांबला. अक्षय जाधव, तुषार पाटील यांच्या झंजावाती चढाया आणि शरद पवारच्या भक्कम पकडी या विजयात महत्वाच्या ठरल्या.
निलेश मोरे, नितीन भोगले यांचा खेळ बँकेचा पराभव टाळण्यास खूपच कमी पडला. शेवटच्या ब गटातील सामन्यात नाशिक आर्मीने मुंबई बंदरचा ४३-२४असा पराभव केला.
दरशन, मोनू यांच्या झंजावाती चढाया तर जयदीपचा भक्कम बचाव याने या विजयाची किमया साधली. मुंबई बंदरच्या दीपक गिरी, शिवराज जाधव, शुभम कुंभार यांचा जोश आज थोडा कमी पडला.