इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ५१ वा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान खेळला गेला. मुंबईने या संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवताना राजस्थानचा पाडाव केला. राजस्थानने दिलेले ९१ धावांचे लक्ष तब्बल ७० चेंडू राखून पूर्ण करताना त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. यासोबतच मुंबईने प्ले ऑफमधील अखेरच्या जागेवरही आपला दावा ठोकला आहे. आपण आज पाहूया की, मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची कितपत संधी आहे.
मोठ्या विजयासह सुधारला रनरेट
राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होती. त्यांचा रनरेट हा समान १० गुण असलेल्या पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यापेक्षा खराब होता. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी राजस्थानला ९० धावांवर रोखल्यानंतर, मुंबईला आपला रनरेट उणेवरून अधिकमध्ये आणण्यासाठी ७ षटकात सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र, त्यांना सामना जिंकण्यासाठी ८.२ षटके लागली. तरीही, त्यांचे धावगती ही आता केवळ -००५ अशी राहिली आहे व त्यांनी गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले.
सोपे आहे पुढील समीकरण
मुंबईला प्ले ऑफमध्ये सामील होण्यासाठी थोडी नशिबाची आणि थोडी मेहनतीची साथ लागणार आहे. मुंबईचा आता साखळी फेरीतील एकमेव सामना राहिला असून, हा सामना साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी ( ८ ऑक्टोबर ) रोजी खेळला जाईल. मुंबईला या सामन्यात गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी दोन हात करावे लागतील. मुंबईला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. या विजयासह त्यांचे १४ गुण होतील.
तत्पूर्वी, मुंबईची नजर ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यावर असेल. कारण, या सामन्यात कोलकाताने विजय मिळवला तरी सरस रनरेटच्या जोरावर ते प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात. कारण, त्यांचा रनरेट हा अधिक आहे. मात्र, राजस्थान संघ या सामन्यात विजयी झाला तर, मुंबईला केवळ विजय अनिवार्य आहे. त्यावेळी रनरेटचा विचार केला जाणार नाही.