ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर चहुबाजूंनी भारतीय संघावर टीका होत आहे. दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटपटू हार पचवून दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाला सल्ले देत आहेत. यात माजी फिरकीपटू मुरली कार्तिकने उडी घेतली आहे. यजमान ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी रिषभ पंतचे अस्त्र वापरण्याचे वक्तव्य त्याने केले आहे.
सराव सामन्यात पंतने झळकावले होते शतक
कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघात गुलाबी चेंडू सराव सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पंतने धुव्वाधार फलंदाजी केली होती. त्याने सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या होत्या. तरीही त्याला पहिल्या कसोटी सामन्यातून डच्चू मिळाला होता.
पंतच्या एक्स फॅक्टरचा करावा वापर
सोनी स्पोर्टशी बोलताना कार्तिक म्हणाला की, “यष्टीरक्षक रिषभ पंत फलंदाजीचा ‘एक्स फॅक्टर’ आहे. तो भारतीय संघाला चांगले परिणाम मिळवून देऊ शकतो. पंतने एका फलंदाजाच्या रुपात काहीही चुकीचे केले नाही. त्याला फलंदाजाच्या रुपात अंतिम पथकात संधी मिळालीच पाहिजे. असे असले, तरीही यष्टीरक्षक वृद्धिमान साहा संघात कायम राहिला पाहिजे.”
भारतीय संघाला करावे लागणार अथक प्रयत्न
येत्या २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना होणार आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर मालिकेत १-१ ने बरोबरी होईल. त्या अनुशंगाने भारतीय खेळाडूंसह संघ व्यवस्थापनही जोरदार तयारीला लागले आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेतल्याने भारतात परतणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. अशात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळेल?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला कोहली आणि पुजाराचे अपयश भोवले, ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत
“विहारीला वरच्या फळीत संधी मिळावी, तर राहुलला…,” माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी बनणार नवे स्टेडियम