सध्या आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया बी कडून खेळणाऱ्या मुशीर खान आणि नवदीप सैनी यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली.
वास्तविक, मुशीर आणि नवदीपची जोडी दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात आठव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी करणारी जोडी बनली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड माजी क्रिकेटपटू रमेश पोवार आणि अभिषेक नायर यांच्या नावे होता. या जोडीनं 2010 मध्ये आठव्या विकेटसाठी दमदार फलंदाजी करत 197 धावांची भागिदारी केली होती. आता मुशीर आणि नवदीपनं 205 धावांची द्विशतकीय भागिदारी करत हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
इंडिया ए विरुद्ध एकेकाळी इंडिया बी ची फलंदाजी ढेपाळली होती. अशा परिस्थितीत आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुशीर खानला अनुभवी नवदीप सैनीची साथ मिळाली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 403 चेंडूत 205 धावांची भागिदारी केली. त्यांच्या या भागिदारीनं इंडिया बी संघाला अडचणीतून बाहेर काढलं. हे दोघं नसते, तर इंडिया बी संघाचा डाव 150 धावांच्या आत आटोपला असता. मात्र या दोघांनी मिळून एकूण 116 ओव्हर फलंदाजी केली आणि स्कोरबोर्डवर 321 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली.
या सामन्यात 19 वर्षीय मुशीर खाननं झुंझार शतक ठोकलं. दुलीप ट्रॉफीतील हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. त्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 373 चेंडूत 181 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 16 चौकार आणि 5 षटकार लगावले. नवदीप सैनीनं 56 धावांचं योगदान दिलं.
हेही वाचा –
विकेटकीपरच्या चुकीची शिक्षा गोलंदाजाला, क्रिकेटच्या या अनोख्या नियमामुळे चाहते गोंधळात
मराठमोळ्या ऋतुराजची आंध्र प्रदेशात क्रेझ! भेट घेण्यासाठी चाहता सुरक्षा मोडून थेट मैदानात
आयपीएलमधील या 3 संघांच्या रडारवर शतकवीर मुशीर खान, लावू शकतात मोठी बोली