---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडच्या भूमीवर भारतीय फलंदाजाचं तडाखेबाज शतक!

On: मंगळवार, जुलै 1, 2025 9:33 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा अक्षरशः मेळा भरला आहे. वरिष्ठ पुरुष संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये खेळतोय, तर महिला संघ 5 टी20 सामन्यांची मालिका खेळतीय. त्याचसोबत भारताचा अंडर-19 संघही 5 युथ वनडे सामन्यांसाठी इंग्लंडमध्ये तळ ठोकून आहे.

या सगळ्यांमध्ये आणखी एक संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, तो म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इमर्जिंग प्लेयर्सचा संघ. 28 जूनपासून सुरु झालेला हा दौरा एक महिना चालणार असून, यामध्ये अनेक युवा खेळाडूंना परदेशात आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे.

या संघात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे मुशीर खानने जो टीम इंडियाच्या खेळाडू सरफराज खानचा लहान भाऊ आहे. नॉटिंगहॅमशर सेकंड इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात मुशीरने 127 चेंडूंमध्ये 14 चौकारांच्या मदतीने शतकी खेळी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. परदेशी परिस्थितीतही तो तितक्याच आत्मविश्वासाने खेळतोय, हे त्याच्या फलंदाजीवरून स्पष्ट झालं आहे.

या दौऱ्यात मुंबईचा संघ नॉटिंगहॅमशर, वॉर्सेस्टरशर, ग्लूस्टरशर आणि काउंटी चॅलेंजर्स यांच्याविरुद्ध पाच दोन दिवसीय व चार एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे हे युवा खेळाडू पुढील पातळीसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मुंबईच्या या इमर्जिंग संघाचं नेतृत्व सूर्यांश शेडगे करत असून, वेदांत मुरकर उपकर्णधाराची भूमिका बजावतो आहे. संघात अंगकृष रघुवंशी, आयुष वर्तक, आयुष जिमारे, हिमांशु सिंह, मनन भट्ट, मुशीर खान, निखिल गिरी, प्रग्नेश कनपिल्लेवार, प्रतीककुमार यादव, प्रेम देवकर, प्रिन्स बदियानी, जैद पाटणकर, हृषिकेश गोरे आणि हर्षल जाधव या युवा खेळाडूंचा समावेश आहे.

मुशीरच्या या दमदार खेळीमुळे भारतीय क्रिकेटला भविष्यात एक नवा तारा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरफराज खानप्रमाणे त्याचा भाऊ देखील मोठ्या स्तरावर यश मिळवेल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---