मुंबई । 2016 साली झालेल्या टी 20 विश्वचषकात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केल्यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकूर रहीम याने ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या ट्विटनंतर करोडो भारतीय प्रेमींनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले. भारताच्या पराभवावर आनंद साजरा करणारा हा बांगलादेशचा खेळाडू आता एमएस धोनीचा जबरा फॅन झाला आहे.
मुश्फिकुर रहीम हा इतर खेळाडूंप्रमाणे एमएस धोनी याला आदर्श मानतो. विशेष म्हणजे रहीम यापूर्वी कोणत्याच खेळाडूला आपला आदर्श मानत नव्हता. मात्र, चाणाक्ष धोनीचे नेतृत्व, खेळाविषयी असलेले प्रेम आणि ज्ञान पाहून तो धोनीचा भक्त झाला आहे.
बिझनेस स्टँडर्सशी बोलताना बांगलादेशचा खेळाडू मुश्फिकर रहीम म्हणाला की, “धोनीचा सिक्स्थ सेंस कमालीचा आहे. त्यामुळे तो इतर खेळाडू आणि कर्णधारापेक्षा वेगळा आहे. त्याला पुढील गोष्टीचे लगेच पूर्वअनुमान होते. त्यामुळे विजयाचे चान्सेस वाढतात. धोनीने आयसीसीची प्रत्येक ट्रॉफी भारताला जिंकून दिली आहे.”
“तो माझा आवडता कर्णधार आहे. मी यापूर्वी कुणालाही आदर्श मानले नाही. पण आता धोनी हा माझा आदर्श खेळाडू आणि कर्णधार आहे. मी धोनीचा जबरदस्त चाहता आहे. माझ्या मते, धोनी सर्वकालीन महान कर्णधारांमध्ये असला पाहिजे,” असेही रहीमने नमूद केले.
33 वर्षीय रहीम हा बांगलादेशचा फिनिशर मानला जातो. त्याने बांगलादेश संघाकडून खेळताना 70 कसोटी सामन्यात 36.47 च्या सरासरीने 4413 धावा केल्या आहेत. तसेच 218 वनडे सामन्यात 6174 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण आंतरराष्ट्रीय 14 शतके आहेत.