आयपीएल 2026 साठी बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) संघात सामील केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. चाहते तसेच काही राजकीय नेत्यांकडून केकेआरवर तीव्र टीका करण्यात येत आहे. अलीकडे झालेल्या IPL मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुरला 9.20 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं होतं. तो IPL 2026 च्या लिलावात विकला गेलेला एकमेव बांग्लादेशी खेळाडू ठरला.
या प्रकरणावरून वाद वाढत असतानाच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी केकेआर फ्रँचायझीला मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या घडामोडी आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, “सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने केकेआरला त्यांच्या बांग्लादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला संघातून बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे.” तसेच, केकेआरने जर त्याच्या बदल्यात रिप्लेसमेंट खेळाडूची मागणी केली, तर बीसीसीआय त्या फ्रँचायझीला पर्यायी खेळाडू उपलब्ध करून देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या प्रकरणावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) देखील आपली भूमिका मांडली आहे. BCB चे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, “आम्ही या संपूर्ण प्रकरणावर शेवटपर्यंत लक्ष ठेवून आहोत. आम्ही क्रिकेटचे लोक आहोत आणि या विषयाकडे राजकीय नव्हे तर क्रिकेटच्या दृष्टीने पाहतो.” त्यांनी पुढे सांगितलं की, केकेआरमध्ये मुस्तफिजुर हा एकमेव बांग्लादेशी खेळाडू आहे आणि पुढे काय घडतं, यावर बोर्ड लक्ष ठेवून आहे. भारत हा बांग्लादेशचा शेजारी देश असून दोन्ही देशांमध्ये क्रिकेट संबंध चांगले असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
https://chat.whatsapp.com/LEwPKes7Mwv4e1L4Cyvhxh
क्रिकेटच्या प्रत्येक ब्रेकिंग अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉइन व्हा.. 👆👆
डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात मुस्तफिजुर रहमानसाठी केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात जोरदार बोली लागली होती. अखेर 9.20 कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजत केकेआर ने या 30 वर्षीय गोलंदाजाला आपल्या संघात घेतलं. मात्र, लिलावानंतरपासूनच सोशल मीडियावर केकेआरवर टीका सुरू झाली होती.






