भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना आज (१८ जुलै) खेळला जाणार आहे. ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण या मालिकेतून बरेचसे युवा खेळाडू पदार्पण करणार आहेत. तर संघातील अनुभवी खेळाडू संघातील आपले स्थान कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. अशातच दिग्गज श्रीलंका गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने भारतीय संघातील एका युवा खेळाडूची तुलना थेट माजी भारतीय विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागसोबत केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. मुरलीधरनने युवा भारतीय फलंदाज पृथ्वी शॉचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, शॉ कसोटी क्रिकेटपेक्षा टी-२० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटसाठी सर्वोत्तम फलंदाज आहे.
त्यांनी ईएसपीएन क्रीकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “पृथ्वी शॉ बद्दल बोलायचं झालं तर, ज्याप्रकारे तो खेळतो; तो कसोटी क्रिकेटपेक्षा वनडे आणि टी-२० क्रिकेटसाठी उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याला पाहून मला वीरेंद्र सेहवागची आठवण येते. तो देखील जोखीम घेऊन फलंदाजी करतो आणि गोलंदाजांना अडचणीत टाकतो.”(Muttaih Muralitharan says Prithvi shaw remind Virender Sehwag fearless bating)
शॉची खेळी भारतीय संघाला मिळवून देऊ शकते विजय
तसेच त्यांचे म्हणणे असे आहे की, पृथ्वी शॉच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळू शकतो. ते म्हणाले की, “जर त्याने धावा केल्या तर भारतीय संघाच्या विजयाची शक्यता वाढेल. कारण तो संघासाठी खूप जास्त धावा काढू शकतो. कारण त्यात क्षमता आहे आणि तो निडर होऊन फलंदाजी करत असतो.”
संघातील स्थान पक्के करणे शॉचे लक्ष्य
पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु त्याला ३ सामन्यात अवघ्या ८४ धावा करण्यात यश आले होते. तसेच त्याने ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १ शतक आणि २ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे त्याला संघातून स्थान गमवावे लागले होतें. परंतु आगामी काळात दौऱ्यावर चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आज हिरो असलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार
रांचीतील मैदाने गाजवणारा इशान किशन पुढे बनला रोहितचा हुकमी एक्का, वाचा त्याच्याबद्दल
विश्वचषकासाठी स्म्रीतीने दिली नव्हती बारावीची परिक्षा, १७व्या वर्षी नाबाद द्विशतक ठोकत आली चर्चेत