तब्बल १९ वर्षांच इंटरनॅशनल करियर, ४९५ मॅचेस, एक हजार तीनशे सत्तेचाळीस विकेट्स, वर्ल्डकप विनर, ऑल टाइम ग्रेटेस्ट स्पिनर, ही सारी आकडेवारी आणि विशेषणे ज्याची आहे तो म्हणजे श्रीलंकेचा माजी क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन. फिरकीच्या तालावर नाचवणे म्हणजे काय असते? हे खरंतर मुरलीधरनने सर्वांना सप्रमाण दाखवून दिले. मुथैय्या मुरलीधरन यांचा आज (14 एप्रिल) वाढदिवस.
मुरलीधरन यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक संकटे आली. दुखापती झाल्या, बॉलिंग ॲक्शनवर ऑब्जेक्शन घेतले गेले, चक्कर म्हटले गेले, बॅन आलं सर्वकाही घडलं. पण या सर्वातून उभ राहत मुरलीने करियरच्या शेवटी क्रिकेट इतिहासात आपल्या नावाचं सुवर्णपान लिहिलं. हे झालं त्याच्या करिअरचं. मात्र, आपण त्याच्या लव्हस्टोरीचा, एकदम आगळ्यावेगळ्या लव्हस्टोरीचा किस्सा जाणून घेणार आहोत.
मुरलीच्या लवस्टोरीची सुरुवात होते सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या टॉलीवूडपासून. एकदा मुरली एका न्यूज चॅनलला इंटरव्यू द्यायला गेलेला. नेमके त्याचवेळी तमिल अभिनेते वगाई चंद्रशेखर त्याच स्टुडिओत इंटरव्यूला आलेले. मोकळ्या वेळात दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्या एकाच भेटीत त्यांची चांगली मैत्री झाली. संबंध घरोब्याचे झाले. दोन्ही कुटुंबाचे एक दुसऱ्याकडे येणे जाणे वाढले. एकदा चंद्रशेखर मुरलीच्या घरी आले असताना, मुरलीच्या आईने त्याच्या लग्नाचा विषय काढला. आता करिअर सेट झालंय म्हणून, सर्वसामान्य आईप्रमाणे मुरलीच्या आईलाही मुरलीचा लग्नाची चिंता सतावत होती. त्यांनी चंद्रशेखर यांच्याकडे कोणी मुलगी आहे का? अशी विचारणा केली.
चंद्रशेखर यांनी थोडा विचार करताच एक नाव सुचवले. मधिमलार राममूर्ती. चेन्नईतील मलार ग्रुप हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर एस राममूर्ति हे मधिमलारचे वडील. डॉक्टर राममूर्ती आणि चंद्रशेखर चांगले मित्र होते. मात्र त्यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झालेले. मधिमलारसाठी योग्य वर शोधायचे चालू होते, ही गोष्ट चंद्रशेखर यांना माहीत होती. मुरलीच्या आई मधिमलारच्या कुटुंबाला भेटायला तयार झाल्या. मात्र, मुरलीला जेव्हा हि गोष्ट सांगितली गेली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. मला करिअरवर लक्ष द्यायचंय आणि त्याच्या कोणताच अडथळा नको हे त्याचे कारण होते. अखेर आई ती आईच. तिने मुरलीला मधिमलार आणि तिच्या कुटुंबाची भेट घ्यायला राजी केलेच.
२००४ मध्ये मुरली मधिमलारला भेटायला चेन्नईत आला. मधिमलार त्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. खरंतर थोडा लाजाळू असलेल्या मुरलीला मधिमलारला एकटे भेटायची जराशी लाज वाटत होती. मात्र घरच्यांसमोर त्याने हात टेकले आणि भेटायचे नक्की केले. तेही फक्त १० मिनिटांसाठी. मात्र ही १० मिनिटे त्याच्यासाठी आयुष्य बदलणारे ठरली. १० मिनिटे म्हणता म्हणता त्यांच्या तास दीड तास गप्पा झाल्या. हसतमुख असलेली मधिमलार त्याला इतकी आवडली की त्याने तिला तिथेच लग्नासाठी प्रपोज केले. मुरलीच्या कुटुंबाला यावर विश्वासच बसला नाही की, लाजराबुजरा मुरली लगेच लग्नाला तयार होईल. दोन्ही कुटुंबांच्या परवानगीने लवकरच दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर एक मजेदार गोष्ट घडली. मुरली असायचा श्रीलंकेत किंवा जगाच्या एखाद्या कोपर्यात. तर मधिमलार चेन्नईत. दोघं तासनतास फोनवर बोलायचे. तेही इतके की फोनचे बिल प्रमाणापेक्षा जास्त यायचे. अखेर शेवटी तो दिवस उजाडला ज्यादिवशी मुरली-मधिमलार एकमेकांचे झाले.
२१ मार्च २००५ रोजी चेन्नईत रितीरिवाजाप्रमाणे हे लग्न पार पडले. लग्नाला तामिळनाडूतील काही आघाडीचे राजकारणी आणि अर्जुन रणतुंगा, सनथ जयसूर्या आणि चामिंडा वास यांसारखे लोकप्रिय श्रीलंकेचे क्रिकेटपटू उपस्थित होते. अख्या टीम इंडियाला त्यांनी आमंत्रण दिलेल. पण ते लग्नाला हजर राहू शकले नाहीत. लग्न झाल्यावर दोघांनी सुखी संसाराला सुरुवात केली. एका वर्षातच त्यांच्या संसारवेलीवर नरेन नावाच फुल उमललं. हाच नरेन आज आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटर बनलाय. तोही तसाच ऑफस्पिनर. दोघात इतकं साम्य की, नरेन अगदी मुरलीसारख्याच ॲक्शनने बॉलिंग करतो. विश्वास नसेल बसत तर युट्युबवर जाऊन पहा.