यावर्षी संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषकाचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ संघबांधणीची तयारी करत आहेत. असे असतानाच, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते यांच्या डोक्याला एक चांगल्या पद्धतीची चिंता सतावत आहे. ती चिंता म्हणजे, सध्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करत या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याची दावेदारी ठोकली आहे. आता याबद्दल श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांनी आपले मत मांडले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात भारताने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली होती. त्यातील अनेक खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय टी२० संघात स्थान मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना खूप विचाराने टी२० संघाची निवड करावी लागणार आहे.
भारतीय संघाचे निवडकर्ते काय विचार करतात आणि ते कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देतात, हे फक्त वेळच सांगू शकेल. पण भारताच्या टी २० विश्व चषकासाठी संघासंदर्भात अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपली प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये आता मुरलीधरन यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल स्पर्धेच्या कामगिरीवरही राहिल लक्ष
मुरलीधरन म्हणाले की, ‘सध्या भारताच्या टी२० विश्वचषक संघासाठी मी सध्या तरी वाट पाहणार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये होणारे आयपीएलचे उर्वरित सामने कसे होतील, हे देखील पाहायला मला आवडेल. या स्पर्धेत खेळाडू कसे कामगिरी करत आहेत आणि कोण चांगले प्रदर्शन करेल हे पाहिले जाणार आहे.’
सध्या भारतीय संघात अनेक फिरकीपटूमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. यापैकी मुरलीधरनने कुलदीप यादवला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुरलीधरन म्हणाले की,“मी कुलदीप यादवला या टी२० विश्वचषकाच्या संघात स्थान देईल. कारण तो एक विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि त्याने हे अनेक वेळा सिद्ध देखील केले आहे. पण दुर्दैवाने आयपीएल संघ त्याला निवडत नाही.”
वरुण चक्रवर्ती चांगला गोलंदाज आहे
भारतीय संघातील युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीबाबत मुरलीधरन यांनी सांगितले की, “वरुण चक्रवर्ती देखील एक चांगला गोलंदाज आहे. तो भारतीय संघासाठी आणि आयपीएल संघासाठी एक उत्तम पर्याय आहे. पण माझा विश्वास आहे की, तो अजंता मेंडिस आणि सुनील नरेन सारखी अजून तरी गोलंदाजी करू शकत नाही. तो फलंदाजांना फसवणारा गोलंदाज नाही. पण सुनील नरेन आणि मेंडिस हे दोघेही गोलंदाज फलंदाजांना मोहात पाडण्याचे काम करतात. तरीही वरुण चक्रवर्ती एक उत्तम गोलंदाज आहे. जो चांगली कामगिरी करत आहे.”
आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात नक्की कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘स्टोक्स भारताविरुद्ध खेळायला घाबरतो का?’ कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर चाहत्याकडून ट्रोल
‘आमच्याकडे आमचा बादशहा आहे’, रिषभ पंतचा फोटो शेअर करत ‘या’ खेळाडूने दिलेले कॅप्शन चर्चेत
विराट विरुद्ध अँडरसन संघर्षात कोण मारणार बाजी? दिग्गज फिरकीपटूने घेतले ‘हे’ नाव