वेंगीपुरप्पू वेंकटसाई लक्ष्मण उर्फ व्हीव्हीएस लक्ष्मण. टीम इंडियाचा संकटमोचक. भारतीय क्रिकेटच्या एका काळच्या फॅब फाईव्हचा एक स्तंभ. लक्ष्मणवर टीम इंडियापासून चाहत्यांपर्यंत सर्वांचा विश्वास होता. अनेक मोठ्या आणि लक्षात राहणाऱ्या इनिंग लक्ष्मणने खेळलेल्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलियाला तर हमखास नडायचा. कोलकात्याची 281 रन्सची इनिंग असो, नाहीतर ऑस्ट्रेलियात जाऊन टेस्ट आणि वनडे दोन्हीत त्याच कामगार टीमला घाम फोडणे असो, लक्ष्मणने हे काम नेहमीच केले. 2003-2004 च्या ऑस्ट्रेलिया टूरवर स्टीव्ह वॉच्या शेवटच्या टेस्टमध्ये त्याने आणि सचिनने 353 रन्सची पार्टनरशिप केलेली. मात्र, याच्या चार वर्ष आधी देखील 353 हा आकडा त्याच्यासाठी लाभदायी ठरलेला. 2000 च्या रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये हैदराबादकडून खेळताना त्याने म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकविरुद्ध वैयक्तिक 353 रन्सची इनिंग खेळलेली.
बेंगलोरमध्ये त्या सेमी-फायनलच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मण 346वर नॉट आउट होता. दुसऱ्या दिवशी त्याच्यासमोर लक्ष होते स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा फर्स्ट क्लास इंडिव्हिजुअल स्कोर करण्याचे. संजय मांजरेकरांच्या नावे 377 रन्सचा तो रेकॉर्ड होता. चौथ्या दिवशी लक्ष्मणची बॅटिंग पाहायला मिळावी म्हणून तिकडे हैदराबादमध्ये एक डॉक्टर खटाटोप करत होता. त्या डॉक्टरने हैदराबादमधून आपली गाडी काढली आणि रात्रभर साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करत डॉक्टर बेंगलोरमध्ये पोहोचला. तो डॉक्टर तिथपर्यंत येण्याचे कारण होते की, मांजरेकरांच्या 377 नंतर 366 रन्सची इनिंग त्या डॉक्टरची होती. आपल्या डोळ्यासमोर आपल्याच हैदराबादच्या खेळाडूने आपला रेकॉर्ड तोडावा म्हणून ते इथपर्यंत आलेले. दुर्दैवाने तसे झाले नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अवघ्या 7 रन्सची भर घालून लक्ष्मण 353 वर आऊट झाला. तरीदेखील अभिमानाने टाळ्या वाजवणारा तो डॉक्टर होता एमव्ही श्रीधर.
एक उत्तम ड्रमर, जॅझ म्युझिकचे शौकीन, डॉक्टर आणि एक अप्रतिम बॅटर. अशा सर्व खुबी एमव्ही श्रीधर यांच्याकडे होत्या. हैदराबादसाठी 1988 ते 2000 असा काळ ते फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. 97 मॅच, 6701रन्स, 21 सेंचुरी आणि 48.91 चे ऍवरेज. असा जबरदस्त रेकॉर्ड असतानाही ते दुर्दैवाने भारतासाठी खेळले नाही. ज्या लक्ष्मणवर त्यांचा विशेष जीव होता, तो लक्ष्मण आपल्या पहिल्या मॅचमध्ये फेल झाल्यावर याच श्रीधर यांनी त्याला मोटिवेट केलेले. रिटायरमेंटनंतर डॉक्टर म्हणूनच त्यांनी आपली सेकंड इनिंग सुरू केली. सोबतच हैदराबाद क्रिकेटसाठी योगदान द्यायचे काम त्यांनी केले.
श्रीधर यांचा भारतीय क्रिकेट संघाशी आठ वर्षांनी संबंध आला. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया टूरवर गेलेल्या टीम इंडियाचे ते असिस्टंट मॅनेजर होते. ही तीच सिरीज जी फक्त वादांसाठी आणि टीम इंडियाच्या पर्थ टेस्ट विनसाठी ओळखली जाते. त्याच सिरीजमधील सर्वात मोठा वाद म्हणजे मंकीगेट प्रकरण (Monkeygate Scandal). भारताच्या हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्यावर ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ऍण्ड्रू सायमंड्सने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला. प्रकरण कमालीचे तापले. हरभजनला तीन मॅचसाठी बँन करण्यात आले. टीम इंडियात सीरिज रद्द करण्याबाबत चर्चा सुरू झालेली. शेवटी न्यूझीलंडच्या हायकोर्ट जजसमोर सुनावणी घेण्यात आली. सचिन तेंडुलकरने हरभजनकडून साक्ष दिली. पूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर हरभजनवरील आरोप हटवले गेले आणि फक्त मॅच फीसच्या 50% दंड भरावा लागला.
या संपूर्ण प्रकरणात मध्यवर्ती भूमिका बजावली श्रीधर यांनीच. भारतीय खेळाडू, बीसीसीआय, कोर्ट आणि मीडिया या चारही गोष्टींदरम्यान समन्वय साधण्याचे काम श्रीधर यांनी केले. त्यांनी या संपूर्ण काळात एकही असे विधान केले नाही, ज्यामुळे प्रकरणाचा भडका उडेल अथवा काही चुकीची माहिती पसरली जाईल. इतकेच नव्हेतर या सीरिजआधी हरभजनला ओळखतही नसणारे श्रीधर त्याच्यासाठी मेंटर बनले. सुनावणीसाठी जाताना हरभजनला तयार करणे, त्याला काय बोलायचे हे सांगणे, त्याचा आत्मविश्वास वाढवणे या सर्व गोष्टी श्रीधर यांनी केल्या. स्वतः हरभजन कबूल करतो की, “त्या वादातून मला वाचवण्याचे सर्वाधिक श्रेय श्रीधर यांचेच आहे.”
मंकीगेट प्रकरण उत्कृष्टरीत्या हाताळल्यानंतर ते बीसीसीआयमध्ये आले. 2013ला बीसीसीआय जनरल मॅनेजर बनले. त्यानंतर क्रिकेटर्स आणि सिलेक्शन कमिटी यांच्यामधील दुवा म्हणून देखील त्यांनी काम केलं. 2017 ला आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका महिन्याभरात 51 व्या वर्षी त्यांच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेल्या ‘ द रेनेसन मॅन’ या पुस्तकाच्या प्रस्ताविकात व्हीव्हीएस लक्ष्मण लिहीतो, “बरे झाले मी तेव्हा श्रीधर यांचा रेकॉर्ड तोडला नाही. कारण ते स्थान फक्त तेच डिझर्व करतात.”
श्रीधर कधीही टीम इंडियासाठी खेळले नाहीत. मात्र, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातून त्यांचे योगदान आणि त्यांचे नाव कधीही वगळले जाणार नाही हेही तितकेच खरे!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्षभर टीमला लीड करणाऱ्या धुरंधराच्या जागी विराटला का बनवलेलं U-19 संघाचा कर्णधार? जरूर वाचा
‘सुपरमॅक्स क्रिकेट’मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण…