भुवनेश्वर कुमारची गणना भारताच्या मुख्य गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याला कारकीर्दीदरम्यान अनेक दुखापती झाल्या आहेत. दुखापतीतून सावरताना त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पुनरागमन केले आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता भुवनेश्वरचे लक्ष भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याचे आहे. यासाठी त्याने आपली रणनीती तयार केली असून पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो आपल्या वर्कलोड व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करेल. जेणेकरून आयपीएलनंतर इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड होईल.
कसोटी संघात परतणे हे लक्ष
रविवारी इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना भारताने जिंकला. सामन्यानंतर भुवनेश्वरला विचारले गेले की, तो कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याचा विचार करत आहे काय? त्यावर तो म्हणाला, “निश्चितपणे, माझे ध्येय कसोटी क्रिकेटमध्ये परत येणे आहे. पण, कसोटी सामन्यांसाठी कशा प्रकारचा संघ निवडला जाईल, हे पाहणे गरजेचे आहे. आयपीएल दरम्यान मी वर्कलोड मॅनेजमेंट आणि सरावावर लक्ष देणार आहे. पुढे भारताला बरेच कसोटी सामने खेळायचे आहेत आणि माझे प्राधान्य कसोटी क्रिकेट आहे.”
भुवनेश्वर पुढे म्हणाला, “मला कसोटी संघात पुनरागमन करायचे आहे. मात्र, मी जास्त दूरचा विचार करत नाही. त्या दृष्टीने योजनाही आखल्या नाहीत. सध्या मी स्वतःला पूर्ण तंदुरुस्त ठेवू इच्छितो.”
आयपीएलमध्ये खेळताना दिसेल भुवनेश्वर
आयपीएलमध्ये भुवनेश्वर सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. तो संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतो. आयपीएलची सुरुवात ९ एप्रिलपासून होत आहे. गेल्या दोन वर्षात भुवनेश्वरला दुखापती झाल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी२० व वनडे सामन्यांच्या मालिकांत त्याने शानदार गोलंदाजी केली आणि आठ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने सांगितले तिसर्या वनडे सामन्यातील यशाचे रहस्य, पाहा व्हिडिओ