---Advertisement---

चार षटके दोन धावा तीन बळी; नबीने टाकला थक्क करणारा स्पेल

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 10:30 AM
---Advertisement---

टी२० क्रिकेट म्हणजे चौकार षटकारांची आतषबाजी असे म्हटले जाते. फलंदाज गोलंदाजांवर या प्रकारात अक्षरशः तुटून पडतात. अगदीच एखाद्या दिवशी या प्रकारात गोलंदाजांचे वर्चस्व असते. अशीच एक घटना बुधवारी (२० ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज या सराव सामन्यात घडली. टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ पूर्वी झालेल्या या अखेरच्या सराव सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने एक ऐतिहासिक स्पेल टाकला.

नबीचा ऐतिहासिक स्पेल
दुबई येथील आयसीसी क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या सराव सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने आपल्या चार षटकात वेस्ट इंडीजच्या स्फोटक फलंदाजांना असे काही बांधून ठेवले की, ते त्याच्या चेंडूंवर धावा काढण्यासाठी अक्षरशः तरसले होते. नबीने आपल्या चार षटकांत दोन निर्धाव षटके टाकताना तीन बळी मिळवत केवळ दोन धावा दिल्या. त्याच्या २२ चेंडूंवर फलंदाज एकही धाव घेऊ शकले नाहीत. अशा प्रकारचे गोलंदाजी पृथक्करण टी२० क्रिकेटमध्ये अगदी दुर्मिळ समजली जाते. मात्र, दुर्दैवाने त्यांची ही कामगिरी क्रिकेटच्या नोंदवहीत लिहिली जाणार नाही. कारण, सराव सामन्याची आकडेवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्राह्य धरली जात नाही.

अफगाणिस्तानचा मोठा विजय
आपले पहिले सराव सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ या सराव सामन्यासाठी मैदानात उतरले होते. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर मोहम्मद शहजाद व हजरतुल्ला झझाई यांनी शानदार सलामी दिली. त्यांनी अनुक्रमे ५४ व ५६ धावांच्या खेळ्या केल्या. गुरबाझ व नजीब यांनी उपयुक्त योगदान देत अफगाणिस्तानला १८९ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात राशिद खान, नबी व मुजीब या फिरकी त्रिकुटाच्या जोरावर अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला १३३ धावांवर रोखले. अफगाणिस्तानचा सुपर १२ फेरीमध्ये भारत, पाकिस्तान व न्यूझीलंडसह ब गटात समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---